लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संकटाने पोलीस दलही हादरले. पोलिसांना स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व प्रकारची कर्तव्ये पार पाडावी लागली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणात बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस आमने सामने आले. तर्क वितर्काच्या राजकीय खेळीत प्रकरण सीबीआयकडे सोपविले. पुढे, वाहिन्यांचा ''टीआरपी'' गुन्हे शाखेने सर्वांसमोर आणला. दुसरीकडे कोरोनाच्या कुतूहलामुळे अनेकांवर बँक खाते रिकामी करण्याची वेळ आली, तर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनमुळे सिनेकलाकारांना धड़की भरली. या पाठोपाठ ईडी कारवाईच्या राजकीय फासाने खळबळ उडाली आहे. एकूणच चिंता...लूट ...अन कारवाईच्या धास्तीने अनेकांची झोप उडाली आहे.
.....
कोरोनाच्या कुतूहलात खाते रिकामी...
लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांत १७ टक्के वाढ झाली. नागरिकांमधील कोरानोबाबतचे कुतूहल, दहशतीचा फायदा ऑनलाइन भामट्यांनी उचलण्यास सुरुवात केली. भामट्यांनी जागतिक आरोग्य संस्था(डब्ल्यूएचओ) किंवा तत्सम नामांकित खासगी किंवा शासकीय यंत्रणेच्या नामोल्लेखाने फसवे ईमेल करतात. या ईमेलमध्ये कोरोनाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती असल्याचा दावा केला जातो. माहिती जाणून घेण्यासाठी अटॅचमेन्ट दिली जाते. ती पीडीएफ, एमपी ४ किंवा डॉक्स प्रकारातील असते. प्रत्यक्षात त्या आड मालवेअरद्वारे वापरकर्त्यांचे तपशील, पासवर्ड चोरण्याचा प्रयत्ना केला गेल्याने अनेकांचे खाते रिकामी झाले.
.....
सुशांतचा मृत्यू अन तर्क वितर्काचा पाऊस
१४ जून रोजी अभनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर हत्या की, आत्महत्या याने सोशल मीडियासह राजकीय वातावरण तापले. याला राजकीय वळण मिळाल्याने प्रकरण सीबीआयकडे वर्ग झाले. त्यात एनसीबी, ईडीनेही उडी घेतली. अद्यापपर्यंत सीबीआयचा अंतिम अहवाल आलेला नाही.
...
पोलिसांमागेच षडयंत्र
अभिनेता सुशांतसिंह राजपूत, दिशा प्रकरणाच्या निमित्ताने राज्य सरकार, मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाखांहून अधिक खाती सापडली आहेत. यातील ८० टक्के खात्याद्वारे खोटी, चुकीची, बदनामी करणारे साहित्य हेतुपुरस्सर पसरवले जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. यामागे नेमके कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहे.
....
बॉलीवूड मध्ये ड्रग्जची नशा..
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन शोधण्यासाठी सुरू झालेला तपास बॉलीवूड सिनेतारकांपर्यंत पोहोचला. यात, अनेक दिग्गज कलाकार, अभिनेत्रींना एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चर्चा, आरोप-प्रत्यारोपाने वर्ष रंगले. त्यामुळे बॉलीवूडमधील कलाकार मंडळीची धडधड वाढली आहे.
.....
वाहिन्यांचा असाही ''टीआरपी''...
अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) वाढविणाऱ्या वाहिन्यांचा गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला. टीआरपी घोटाळ्याने सर्वाचेच धाबे दणाणले. बीएआरसीला मदत करणाऱ्या हंसा रिसर्च सेंटरचा माजी कर्मचारी विशाल भंडारीपासून सुरू झालेले अटक सत्र बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता पर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात रिपब्लिक टीव्हीसह महान्यूज, फक्त मराठी, बॉक्स सिनेमासह अनेकांचा टीआरपी उघड झाला. यात धरपकड सुरू आहे.
.....
गुन्हेगारीही अनलॉक
लॉकडाऊनमध्ये ब्रेक लागलेल्या रस्त्यावरील
गुन्हेगारी अनलॉकच्या काळात पुन्हा परिस्थिती जैसे थे स्वरूपात आली. यात, नोव्हेबर अखेरपर्यंत मुंबईत एकूण ४७ हजार ७५६ गुन्हे नोंद झाले. यापैकी रस्त्यावरील गुन्हेगारीचे १४ हजार ६०९ गुन्हे नोंद झाले आहे. यात वाहनचोरीत वाढ झाली आहे.
....
ईडीचा फास...
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारात आधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईकपाठोपाठ अन्य प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्याविरुद्ध ईडीचा ससेमिरा सुरू होताच, राजकीय वर्तळात खळबळ उडाली आहे.