सुरतमध्ये बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक स्लॅब कारखाना सुरू; ९६,००० जे-स्लॅब तयार करणार, रेल्वेमंत्र्यांची कारखान्याला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:51 AM2024-12-02T05:51:57+5:302024-12-02T05:52:37+5:30
१९ एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता १२० ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे.
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅक स्लॅबनिर्मिती कारखाना सुरतच्या किम या गावात सुरू करण्यात आला आहे. हा देशातील सर्वांत मोठा ट्रॅक स्लॅबनिर्मिती कारखाना आहे. १९ एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता १२० ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे.
आधुनिक शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च क्षमतेच्या बॅलास्टलेस ट्रॅक (खडीरहित रूळ) स्लॅबची निर्मिती करण्यासाठी कारखाना तयार करण्यात आला आहे. हा कारखाना बुलेट ट्रेन प्रकल्पस्थळापासून जवळ असल्याने वाहतूक आणि पुरवठा वेळेत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रेल्वे रुळांच्या स्थिरतेसाठी काँक्रीट ट्रॅक स्लॅब महत्त्वाची भूमिका बजावतात. या कारखान्याची पाहणी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅकनिर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाच्या गुजरात भागातील ३५२ कि.मी.साठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
या प्रकल्पाच्या गुजरात भागातील आणि दादरा-नगर हवेली भागातील ३५२ कि.मी.पैकी २३७ कि.मी. रुळांसाठी सुरतमधील कारखान्यातून काँक्रीट ट्रॅक स्लॅब तयार करण्यात येणार आहेत. हे पूर्वनिर्मित काँक्रीट ट्रॅक स्लॅब साधारणपणे २२०० मि.मी. रुंद, ४९०० मि.मी. लांब आणि १९० मि.मी. जाड आहेत. प्रत्येक स्लॅबचे वजन अंदाजे ३.९ टन इतके आहे. या कारखान्याची उत्पादन क्षमता ९६००० जे-स्लॅब तयार करण्याची आहे.
महाराष्ट्रातही कारखाना?
जपानमध्ये अवलंबलेल्या पद्धतींवर आधारित ट्रॅकच्या कामासाठी सर्व अभियंत्यांनी जपानी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण अभ्यासक्रम पूर्ण केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच भविष्यात महाराष्ट्रातील भागासाठीही ट्रॅक स्लॅब कारखाना उभारण्यात येणार असून, त्याची निविदा पुढच्या वर्षी फेब्रुवारीत काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिमेंट ॲस्फाल्ट मॉर्टर
(सीए मॉर्टर) : सिमेंट, डांबर वाळू, पाणी आणि इतर रासायनिक पदार्थांपासून बनवलेले मिश्रण. हाय-स्पीड रेल्वे ट्रॅक सिस्टीमचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पात ट्रॅक स्लॅबवर रूळ बसविण्यात येत असून त्यासाठी स्लीपरची आवश्यकता नसते. यासाठी आधुनिक जपानी तंत्रज्ञानावर आधारित कारखाना तयार करण्यात आला आहे. ट्रॅक स्लॅब निर्मितीच्या कामासाठी अभियंत्यांना विशिष्ट प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचा फायदा भविष्यातील विविध प्रकल्पांसाठीही होणार आहे.
- अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री