ट्रॅकमॅन्सनाही बसतायेत उष्णतेच्या झळा
By सचिन लुंगसे | Published: May 24, 2024 06:29 PM2024-05-24T18:29:51+5:302024-05-24T18:31:16+5:30
मुंबईसह राज्यभरात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असून, जळगाव येथे तर गुरुवारी ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबई : रेल्वे रुळांलगत देखभाल दुरुस्तीची कामे करणा-या ट्रॅकमॅन्सनाही उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास होत असून, उन्हातान्हात काम करणा-या ट्रॅकमॅनच्या आरोग्याची काळजी घ्यावी, याकडे रेल्वे कर्मचा-यांच्या युनियनने लक्ष वेधले आहे.
मुंबईसह राज्यभरात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असून, जळगाव येथे तर गुरुवारी ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेची लाट नसली तरी उष्ण आणि दमट हवामानाने नागरिकांना नकोसे केले आहे. मुंबईतल्या तापदायक उन्हात कष्टकरी काम करत असून, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरही देखभाल दुरुस्तीच्या कामाकरिता ट्रॅकमॅन भरदुपारी कष्ट करत आहेत. उष्ण हवामानाचा ट्रॅकमॅनला फटका बसत असून, मुंबई मंडळातील बहुतांशी ट्रॅकमॅनला या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटेनेर युनियन समाजमाध्यमांद्वारे लक्ष वेधले आहे.
सेंट्रल रेल्वे ट्रॅकमेंटेनेर युनियन सरचिटणीस ए.व्ही. कांथाराजू यांनी सांगितले की, देशभरात सुमारे ३.५ लाख ट्रॅकमॅन्स कार्यरत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे ट्रॅकमॅन्सना आरोग्याचा त्रास होत असून, ट्रॅकमॅन्सना दिलासा मिळावा म्हणून आम्ही सातत्याने आवाज उठवित आहोत. केंद्राकडून ट्रॅकमॅन्सना न्यायाची अपेक्षा आहे.
मुंबईच्या रुळांलगत, रुळांवर देखभाल दुरुस्तीची कामे करणा-या ट्रॅकमॅन्स किंवा गँगमन यांना त्रास होऊ नये म्हणून प्रवाशांनाही थोडी काळजी घेतली पाहिजे. आपण प्रवास करताना रुळांवर कचरा टाकून देतो. आपण अशा गोष्टी टाळल्या तर त्यांचेही कष्ट कमी होतील, असे मुंबई रेल प्रवासी संघाचे सरचिटणीस सिद्धेश देसाई यांनी सांगितले.