Join us

‘लाइफ स्टाइल’सह ‘लोकमत’कडून ‘ट्रेड सेटर’ कार्यक्रम स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 2:49 AM

‘कोरोना’मुळे घेतला निर्णय : सामाजिक जबाबदारीतून उचलले पाऊल

मुंबई : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर थैमान घालत असलेल्या कोरोना आजाराने आता राज्यासह मुंबईत शिरकाव केला आहे. कोरोनाचे रुग्ण ठिकठिकाणी आढळून येत असून, यावर खबरदारी म्हणून सरकारने अनेक कार्यक्रम रद्द केले असतानाच, आता ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहानेही सामाजिक भान जपत, मुंबईत आयोजित दोन मोठे कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ‘लाइफ स्टाइल’सह ‘ट्रेड सेटर’ कार्यक्रमाचा समावेश आहे, अशी माहिती ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन विजय दर्डा यांनी दिली.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे १६ मार्च रोजी विलेपार्ले येथील सहार हॉटेलमध्ये ‘ट्रेड सेटर’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन होणार होते. या कार्यक्रमास मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळी सहभागी होणार होती, तर २३ मार्च रोजी परळ येथील आयटीसी हॉटेलमध्ये ‘लाइफ स्टाइल’ या कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार होती.

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आणि यासंदर्भातील खबरदारीचा उपाय म्हणून हे दोन्ही कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळले पाहिजे. मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतील, असे आयोजनही स्थगित करावे किंवा पुढे ढकलावे, असे आवाहन शासनाने केले आहे. ‘लोकमत’ नेहमीच समाजाच्या सुखदु:खात सहभागी झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसोबत उभा ठाकला आहे. नागरिक, आमचे पाहुणे, स्पर्धक, विजेते, वक्ते, कलाकार यांची सुरक्षा आणि आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जबाबदार वृत्तपत्र म्हणून आम्ही हे दोन्ही कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रभाव ओसरला की, आम्ही नव्या तारखांची घोषणा करू, असे विजय दर्डा यांनी सांगितले.

टॅग्स :लोकमत