Join us  

अग्निशमन दलाच्या खाजगीकरणाला कामगार संघटनांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:07 AM

मुंबई : अग्निशमन दलामध्ये कंत्राटी पद्धतीने वाहनचालक घेण्याचा प्रस्ताव अडचणीत आला आहे. ५४ खाजगी वाहनचालक तीन शिप्टमध्ये काम करतील, ...

मुंबई : अग्निशमन दलामध्ये कंत्राटी पद्धतीने वाहनचालक घेण्याचा प्रस्ताव अडचणीत आला आहे. ५४ खाजगी वाहनचालक तीन शिप्टमध्ये काम करतील, असा हा प्रस्ताव आहे. मात्र, शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने या खाजगीकरणाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे सध्या हा प्रस्ताव स्थायी समितीने राखून ठेवला आहे.

अग्निशमन दलात ६६५ यंत्र चालकांची पदे आहेत. हे यंत्रचालक जीप, मोटारगाड्या आदी वाहने, तसेच दुर्घटनास्थळी पंप चालवून आग विझविण्यासाठी पाणीपुरवठा करण्याचेही काम करतात. दलातील काही वाहने आधुनिक असून, दुर्घटनेच्या वेळी ती हाताळण्यासाठी केंद्र चालकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे दलातील प्रशिक्षित केंद्रचालक जीप व मोटारगाड्या चालविण्यासाठी नियुक्त केल्यानंतर दुर्घटनेच्या वेळी पुरेसे यंत्रचालक उपलब्ध होत नाहीत.

काळबादेवी येथील दुर्घटनेची कारणं शोधण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी रुग्णवाहिका व इतर लहान वाहने चालविण्यासाठी खाजगी वाहन चालकांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून दुर्घटनेच्या वेळी पुरेशा प्रमाणात यंत्रचालक उपलब्ध राहतील, असा सल्ला समितीने दिला होता. त्यानुसार ५४ वाहन चालक तीन शिप्टमध्ये काम करण्यासाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी ठेकेदाराला चार कोटी रुपये देण्यात येतील.

यासाठी कामगार संघटनांचा विरोध...

कंत्राटी कामगार मर्यादित स्वरूपात काम करीत असल्याने आणीबाणीच्या वेळी त्यांनी काम न केल्यास त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागतील, अशी भीती मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने पालिकेकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

*अग्निशमन दलात ६६५ यंत्रचालकांची पदे अग्निशामक वर्गातून पदोन्नतीने भरली जातात. या पदांवर किमान पाच वर्षे अग्निशामक म्हणून कामाचा अनुभव, एक वर्ष जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक असते.

* आतापर्यंत ६६५ यंत्रचालकांपैंकी ५०७ पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित आरक्षित पदांसाठी उमेदवार मिळत नसल्याने १५८ पदे रिक्त आहेत.