मुंबई - विलेपार्ले येथील एका व्यापा-याची बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावून इमारत पुनर्विकासाचा घाट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यापा-याच्या तक्रारीवरून याबाबत फसवणुकीचा गुन्हा नोंदवून वांद्रे पोलीस तपास करत आहेत.विलेपार्ले पूर्व परिसरात कुटुंबासोबत राहत असलेल्या व्यापारी नैलेश मुलचंद छेडा (५०) यांची अजमेर रोड आॅफ मालविया रोडवर प्लॉट नं. ५७ जागा आहे. या जागेवर सहकार नावाची इमारत आहे. असे असतानाही जागेचे मालक छेडा हे भाडेकरू असल्याचे भासवत जितेंद्र शहा याने २०१५ मध्ये एक बनावट प्रतिज्ञापत्र बनवले. हे प्रतिज्ञापत्र पालिकेच्या वांद्रे पश्चिमेकडील के वॉर्डाच्या इमारत प्रस्ताव कार्यालयात दाखल करून सहकार इमारतीच्या पुनर्विकासासाठी परवानगी मिळविली. परवानगी मिळताच शहा याने बिल्डिंग पाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार छेडा यांना समजला. छेडा यांनी आपली आणि पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याची तक्रार करत वांद्रे पोलीस ठाणे गाठले. छेडा यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी शहाविरोधात भादंवी कलम १९९, २00, ४२0 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा बळकावून व्यापाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 5:37 AM