लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सॅण्डहर्स्ट रोड येथील प्रसिद्ध चोरबाजारातील रहदारीचे रस्ते खासगी विकासकांनी बंद केले आहेत. मात्र हे रस्ते गेले वर्षभर बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने या व्यापाऱ्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भायखळ्यातील निवासस्थानाबाहेर गुरुवारी आंदोलन केले.
मुंबईमधील सॅण्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला परिसराला चोरबाजार म्हणून ओळखले जाते. चोरबाजाराच्या आजूबाजूच्या परिसराचा पुनर्विकास सुरू आहे. यासाठी विकसकाने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याने येथील व्यापाऱ्यांनी कोविड काळापूर्वी महापौरांकडे दाद मागितली होती. त्यावेळेस अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन महापौरांनी दिले होते. मात्र आता मुंबईतील सर्व व्यवहार सुरू होत असताना येथील व्यवसाय, रस्ते बंद असल्याने ठप्प आहेत.महापौरांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी व्यापाऱ्यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. महापाैर पेडणेकर यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच हा परिसर भेंडी बाजारअंतर्गत येत असल्याचे सांगितले. नगरसेविका झाल्यानंतर या भागाची पाहणी केली होती. पुन्हा पाहणी करून रस्ते मोकळे करू, असे आश्वासनही त्यांनी व्यापाऱ्यांना दिले.