३१ वर्षांची लोकल ‘वारी’ची परंपरा
By admin | Published: July 15, 2016 01:46 AM2016-07-15T01:46:49+5:302016-07-15T15:32:58+5:30
महाराष्ट्रभरातून निघालेल्या दिंड्या आषाढी एकादशीनिमित्ताने आपल्या गंतव्य स्थानी, म्हणजेच विठ्ठलाच्या दरबारी पोहोचतील.
प्रवीण दाभोळकर, मुंबई
महाराष्ट्रभरातून निघालेल्या दिंड्या आषाढी एकादशीनिमित्ताने आपल्या गंतव्य स्थानी, म्हणजेच विठ्ठलाच्या दरबारी पोहोचतील. आपल्या दैनंदिन कामामुळे पंढरीला जाण्याची इच्छा अपूर्ण राहिलेले वारकरी बोरीवली ते चर्चगेट लोकल वारीला निघत आहेत. आज आषाढी एकादशी निमित्त समस्त प्रवासी वारकरी वर्ग हरिनाम सप्ताह संपूर्ण करत, एक दिवसाची विशेष रजा टाकून, आपल्या पारंपरिक वेषभूषेत, टाळ, मृदुंगासोबत हरिनामाचा गजर करत आणि मनातल्या चैतन्याची अनुभूती करणारे अभंग गात, ‘विठ्ठल रुक्मिणी’ची पालखी खांद्यावर घेत, लोकलमध्ये हा सोहळा साजरा करणार आहे.
श्री ढोकेमामा सहप्रवासी भजनी मंडळातर्फे आषाढी एकादशीच्या दिवशी होणाऱ्या लोकल वारीची परंपरा १९८५ पासून अविरत चालू आहे. ही परंपरा या वषीर्ही चालू ठेवत, बोरीवली ते चर्चगेट ८.५७ च्या लोकलमध्ये ‘पुंडलिक वरदा... हरी विठ्ठल!’ असा विठ्ठलनामाचा जयघोष होणार आहे. रोज सकाळच्या चर्चगेट लोकलमध्ये हे वारकरी नियमित विठ्ठलनामाचे गुणगान गात असतात. अभंग प्रवास हाच वारकऱ्यांच्या संत परंपरेचा पाय असून, मराठी, गुजराती अशा सर्वभाषिक समाजाला आपलेसे करत बंधुत्वाची जोपासना करण्याचा प्रयत्न होत असल्याचे, वारकरी संप्रदायाच्या विचारांचे प्रसारण, ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांमध्ये शिस्त आणि सुसूत्रता आणणे, ओरडणाऱ्या भजनाचे सुरेल भजनात रूपांतर अशा शिक्षणातून सहप्रवासी या नात्याने एकेमकांना जवळ आणत आहेत. यामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. तसेच आठवड्यातून एकदा प्रबोधन देण्यासाठी वारकरी पंथातील नामवंत व्यक्तीला या मंडळाकडून आमंत्रित केले जाते.
मूळचा शेतकरी असलेला वारकरी शहराकडे वळला आणि खासगी नोकरीतल्या ९ ते ६च्या वेळेत अडकून त्याचे माहेर पंढरीपासून दुरावू लागला, पण टाळ, मृदुंग आणि अभंगाचे मूळ विसरेल तो वारकरी कसला? मग तो दैनंदिन लोकलच्या प्रवासात ही आपली पिढीजात परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करू लागला.
मुंबईची धमनी असलेल्या लोकलमधून असे असंख्य वारकरी सकाळ-संध्याकाळी अभंगाच्या स्वरातून सहप्रवासी म्हणून आपल्या कानावर पडतात. शिपिंग कंपनीत सहायक महाप्रबंधक असलेले मंडळाचे संचालक वसंत प्रभू, आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेली २५ वर्षे ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. सर्वांच्या भावनांचा आदर करत, विठ्ठलभक्तीशी प्रामाणिक राहण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे प्रभू सांगतात.