Join us

पारंपरिक आणि मुस्लीम मतांनी अरविंद सावंतांना तारले; यामिनी जाधवांच्या मतदारसंघातूनच आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 12:16 PM

भाजपशी युती नाही, शिवसेना फुटून दोन गट पडलेले अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या अरविंद सावंत यांनी उद्धवसेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या साथीने निवडणूक लढविली.

- मनोज मोघेमुंबई : दक्षिण मुंबई हा आपला गड राखण्यात उद्धवसेनेला यश आले आहे. या मतदारसंघात उद्धवसेनेने आपली पारंपरिक मते राखलीच, शिवाय काँग्रेसला साथ देणारी मुस्लीम मतेही मिळाली आहेत. विशेष म्हणजे यामिनी जाधव ज्या मतदारसंघातून विधानसभेला निवडून आल्या त्या मतदारसंघातच तब्बल ४६ हजारांची आघाडी मिळाल्याने सावंतांचा विजय सुकर झाला तर यामिनी जाधवांना पराभवाचा सामना करावा लागला. 

भाजपशी युती नाही, शिवसेना फुटून दोन गट पडलेले अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या अरविंद सावंत यांनी उद्धवसेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या साथीने निवडणूक लढविली. त्यामुळे मतांच्या शाश्वतीची चिंता असताना उद्धव ठाकरे यांच्याप्रती असलेली शिवसैनिकांची निष्ठा आणि सहानुभूती या दोन्ही या मतदारसंघात दिसून आल्या. राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यानुसार सगळी नसली तरी काही मते यामिनी जाधव यांच्या पारड्यात पडली. मात्र, त्याचे विजयात परिवर्तन होऊ शकले नाही हे आकडेवारी सांगते. कारण वरळी वगळता इतर काेणत्याही मतदारसंघात त्याचा थेट लाभ जाधवांना झाला नाही.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघात आणि मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघात यामिनी जाधवांना भरघोस मते मिळाली. मलबार हिलमध्ये यामिनी जाधवांना ४८ हजारांचा लीडही मिळाला. तर कुलाबा मतदारसंघात त्यांना १० हजार मते मिळाली आहेत. यातील बहुतांशी मते ही भाजपची हक्काची मते आहेत, जी यामिनी जाधव यांच्या पारड्यात पडली. 

ठाकरेंना वरळीचा विचार करावा लागणारवरळीत आदित्य ठाकरे आमदार असतानाही या ठिकाणी अरविंद सावंत यांच्या पारड्यात यामिनी जाधवांपेक्षा केवळ सहा हजार मते जास्त मिळाली आहेत. पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना ठाकरेंना याचा विचार करावा लागणार आहे.

व्यापाऱ्यांची मते सावंत यांना मोठ्या प्रमाणात मुस्लीम तसेच व्यापारी लोक असलेल्या व अमिन पटेल आमदार असलेल्या मुंबादेवी मतदारसंघात अरविंद सावंत यांना एकगठ्ठा मतदान झाल्याचे समोर आले आहे. या मतदारसंघात अरविंद सावंत यांना ४३ हजारांची आघाडी मिळाली आहे. याला लागून यामिनी जाधवांचा मतदारसंघ असतानाही त्याचा लाभ त्यांना मिळालेला नाही.

टॅग्स :मुंबई दक्षिण