पारंपरिक आणि पाश्चात्य वाद्यांची रंगली मैफील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 09:26 PM2018-01-15T21:26:04+5:302018-01-15T21:38:11+5:30
पारंपरिक सूरांच्या साथीला आधुनिक वाद्यांची मिळालेली जोड, गिटार, मेंडोलीन, व्हायोलीन व ड्रम या वाद्यांच्या सूर आणि नादाच्या अद्वितीय मिलाफातून आसमंतात उमटलेले तरंग, पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा साधला गेलेला अद्वितीय असा मेळ ...
पुणे - पारंपरिक सूरांच्या साथीला आधुनिक वाद्यांची मिळालेली जोड, गिटार, मेंडोलीन, व्हायोलीन व ड्रम या वाद्यांच्या सूर आणि नादाच्या
अद्वितीय मिलाफातून आसमंतात उमटलेले तरंग, पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा साधला गेलेला अद्वितीय असा मेळ ... अशा चैतन्यमयी अविष्कारामधून विचारांच्या पलीकडील नि:शब्दतेची अनुभूती तरूणाईला मिळाली. सहजयोग ध्यान केंद्रातर्फे ‘विलंब’ हा युरोपियन साधकांचा बँंड् हा सध्या भारत दौ-यावर आहे.
यातील पुणे भेटीदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात बँडमधील सहा कलाकारांनी आपल्या अभूतपूर्व कलाविष्काराचे दर्शन रसिकांना घडविले. ’अनुभव’, कृती, परिवर्तन’ या संकल्पनेच्या माध्यमातून सहजयोग आत्मसाक्षात्काराची माहिती आणि अनुभव त्यांनी दिला. प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या समन्वयक बी. मीनाक्षी सुरेश, केंद्राचे समन्वयक चंद्रकांत देवडा, रितेश बिरारी, डॉ. विश्वजित चव्हाण
आदी उपस्थित होते. फिनबर अन्स्लो, ग्वेंडालीन अन्स्लो, क्लाऊडीओ मेरिको, सिल्विया बिर्नेटी, लुका यांनी वादन आणि गायनातून तरूणाईला खिळवून ठेवले. कार्यक्रमाची सुरूवात ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ आरतीने झाली. त्यानंतर ‘लँंड आॅफ प्युरिटी’ या गीताने भारतीय भूमीला वंदन करण्यात आले. ’कमिंग डाऊन फ्रॉम द माऊंटन’ या गाण्यातून आपल्यातील अहंकार दूर करण्याचा संदेश देण्यात आला. ‘ईस्ट और वेस्ट’ या गाण्याने पूर्व आणि पश्चिम असो सर्वत्र आनंद एकच असतो असे सांगितले आणि या गाण्यावर तरूणाईची पावले थिरकली.
ग्वेंडोलीन अन्स्लो हिने सहजयोग आणि श्री माताजी निर्मलादेवी यांच्या कार्याची माहिती दिली. या स्वरमयी मैफिलीने युवापिढीची सायंकाळ
अविस्मरणीय ठरली. ’
संस्कृत भाषेमध्ये दोन विचारांमधील अंतराला विलंब असे म्हटले गेले आहे. ही निर्विचार अवस्था तरूणांना सर्व मानसिक ताणाच्या पलीकडे घेऊन जाते. संगीत हे त्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहे. पुण्यात येऊन हे संगीत ऐकविण्यात आम्हाला नेहमीच आनंद वाटतो- फिनबर अन्स्लो