"पारंपरिक खेळ हे जीवनाचे अंग झाले पाहिजे"
By मनोहर कुंभेजकर | Published: March 6, 2024 08:38 PM2024-03-06T20:38:55+5:302024-03-06T20:39:29+5:30
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन.
मुंबई - श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ दि, २६ जानेवारी ते दि,२१ फेब्रुवारी रोजी आयोजित केला गेला होता . त्याला मुंबईतुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. विविध १६ प्रकारच्या पारंपरिक क्रीडा स्पर्धा या मध्ये आयोजित केल्या गेल्या . क्रीडा महाकुंभाच्या या आयोजनामध्ये विविध क्रीडा अससोसिएशन / संस्था यांचा महत्वाचा सहभाग होता . या सर्व संस्थांचा सत्कार उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुंबई उपनगर लगोरी असोसिएशन, ग्रेटर बॉंबे बॉडी बिल्डर्स असोसिएशन, मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन, मुंबई शहर उपनगर तालीम महासंघ , मुंबई उपनगर जिल्हा तालीम महासंघ, मुंबई शहर आणि उपनगर खो खो संघटना , मुंबई उपनगर लेझीम असोसिएशन, विटी दांडू असोसिएशन , मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना , टॅग ऑफ वॉर असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली . बरोबरीने महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचे ही कौतुक पालकमंत्री लोढा यांनी केले.
छत्रपती शिवाजी पारंपरिक क्रीडा महाकुंभ ही स्पर्धा म्हणजे एक सुरुवात आहे. या पारंपरिक खेळांना पुनर्जीवन देण्याचा काम आपण सगळे मिळून केले आहे . या स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यात झाल्या पाहिजेत. क्रीडा भारती संस्थेने याबाबत पुढाकार घ्यावा. पारंपरिक खेळ हे जीवनाचे अंग झाले पाहिजेत " असे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आणि उपस्थित असोसिएशन च्या प्रतिनिधींना स्मृती चिन्ह देऊन सर्वांचे आभार मानले.