वेसावा कोळीवाड्यात अणुकुचीदार भाल्याने दहीहंडी फोडण्याची पुरातन परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 07:47 PM2018-08-28T19:47:10+5:302018-08-28T19:47:28+5:30
केरळनंतर मासेमारीत देशात दुसरा क्रमांक असणाऱ्या अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकांपासून 7 किमी असलेल्या वेसावा कोळीवाड्याने आपली पुरातन परंपरा व संस्कृती अद्यापही जपली आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- केरळनंतर मासेमारीत देशात दुसरा क्रमांक असणाऱ्या अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकांपासून 7 किमी असलेल्या वेसावा कोळीवाड्याने आपली पुरातन परंपरा व संस्कृती अद्यापही जपली आहे. देशात सर्वत्र मानवी मनोरे रचून दहीहंडीची प्रथा सर्वश्रुत आहे. मात्र वेसावे कोळीवाड्यात लांब लाकडी काठीला अणुकुचीदार भाला बांधून दहीहंडी फोडण्याची येथील पुरातन परंपरा आहे. यंदा येथील वेसावा बुधा गल्ली कोळी समात संस्थेला येथील दहीहंडी फोडण्याचा मान नऊ वर्षांनी मिळाला आहे. दिवाळीप्रमाणे हा आमच्या बुधा गल्लीसाठी मोठा उत्सव असून खास येथील सुमारे 2000 स्त्री-पुरुष, लहान मुले आणि माहेरवाशीण यांच्यासाठी खास निळ्या रंगाचा सुमारे 6 लाखांचा पेहराव तयार करून घेण्यात आला असून या दहीहंडी उत्सवासाठी सुमारे 15 लाख खर्च अपेक्षित असल्याची माहिती वेसावा बुधा गल्ली कोळी समाज संस्थेचे अध्यक्ष राजहंस लाकडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
रोज सायंकाळी हरिनाम सप्ताह आणि गल्लीने ठरवलेल्या ड्रेस कोडमध्ये रात्री 7.30 ते 11 पर्यंत मिरवणूक काढण्यात येते.
या इव्हेंटवर 10 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या रविवार 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित वेसावे गावातून वेसावा बुधा गल्ली कोळी समाज संस्थेची पारंपरिक वेषात भव्य मिरवणूक निघणार आहे. तर सोमवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास येथील दहीहंडी उत्सवाला शानदार सुरुवात होणार असून या उत्सवाला संपूर्ण वेसावे गाव सहभागी होणार आहे. दहीहंडीसाठी तयार केलेला खास निळ्या रंगाचा पेहराव परिधान करून या गल्लीतील सर्व नागरिक, महिला व लहान मुले या नेत्रदीपक मिरवणुकीत सहभागी होतील, अशी माहिती या संस्थेचे उपाध्यक्ष वृंदावन जिंगणे व सचिव प्रदीप आडी यांनी दिली.
वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या माध्यमातून येथील श्रीराम मंदिरात कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने येथील आठ गल्ल्यांना हा उत्सव आणि हंडी फोडण्याचा दर नऊ वर्षानी मान मिळतो. यंदा हा मान आमच्या
वेसावा बुधा गल्ली कोळी समाज संस्थेला मिळाला असल्याची माहिती राजहंस लाकडे यांनी दिली. वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र चिंचय आणि सर्व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
येथील पुरातन परंपरेप्रमाणे या उत्सवच्या सात दिवस आगोदर म्हणजे नारळी पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी श्रीराम मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह सुरु होतो. संपूर्ण राम मंदिर परिसराला आणि बुधा गल्लीला विदयुत रोषणाई आणि कंदील लावून येथे श्रावण महिन्यातच दिवाळी आम्ही साजरी करतो असे या गल्लीच्या कार्यकारी मंडळाने सांगितले. या सात दिवसत या गल्लीच्या वतीने अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक आणि मोफत वैद्यकीय शिबीर आदी विविध कार्यक्रम राबवले जातात.श्री हरीनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण वेसावे गाव कृष्ण जन्म सोह्ळ्यासाठी श्री राम मंदिरात मध्य्ररात्री हजर असतो.
दहीहंडीच्या दिवशी वेसावे गावातील सर्व मानाच्या हंड्या अणकुचीदार भाल्याच्या सहाय्याने फोडल्या जातात. तत्पूर्वी मानाच्या हंडीची भव्य मिरवणूक पूर्ण वेसावे गावातून काढली जाते. मनाच्या काठीची आरती केली जाते.खास या उत्सवासाठी या गल्लीच्या 250 सभासदांसाठी तयार केलेला पेहराव हे या शोभयात्रा मिरवणुकीचे खास आकर्षण आहे आणि ही मिरवणूक दहीहंडीच्या दिवशी सकाळी ११ च्या सुमारास श्री राम मंदिर येथे आल्यानंतर वेसावा बुधा गल्ली कोळी समाज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजहंस लाकडे यांच्या हस्ते यंदाची हंडी अणूंकुचीदार भाल्याने फोडण्यात येणार आहे.त्यानंतर वेसावे गावातील नवसाच्या हंड्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत फोडल्या जाणार आहे अशी माहिती वृंदावन जिंगणे व सचिव प्रदीप आडी यांनी शेवटी दिली.