धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: अवाढव्य सुशोभीकरणच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता, रिक्षा चालकांची बेशिस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण इत्यादि कारणांनी भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक परिसर हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे . परंतु महापालिका आणि पोलिसांकडून ठोस कारवाईच केली जात नसल्याने सामान्य नागरिक आणि वाहन चालक हे निर्माण केले जाणारे अडथळे, वाहतूक कोंडी मुळे त्रस्त झाले आहेत.
भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक हे भाईंदर पश्चिम परिसरातीलच नव्हे तर थेट मुर्धा ते उत्तन - चौक आणि पुढे गोराई पर्यंतच्या नागरिकां कडून ये - जा करण्यासाठी उपयोगात येते . या ठिकाणी वाहतूक कोंडी होते म्हणून ह्या भागातील जुनी बांधकामे पालिकेने तोडून परिसर मोकळा केला होता . मात्र तत्कालीन सत्ताधारी भाजपा नगरसेवक व नेत्यांच्या आग्रहावरून येथे २ कोटींचे प्रवेशद्वार व सुशोभीकरण चे काम मंजूर झाले. तेच काम सत्ताधारी आणि प्रशासनाने तब्बल ८ कोटीं पर्यंत वाढवले . ह्या कामा मुळे प्रवाश्याना ये - जा करण्यास अडथळा होत असून रिक्षाच्या रांगा सुद्धा भर रस्त्यात लावल्या जात आहेत.
अनेक रिक्षा चालक हे मनमानीपणे रांग सोडून रिक्षा उभ्या करतात. तसेच प्रवाश्याना उतरवण्यासाठी भर रस्त्यात रिक्षा थांबवल्या जातात . यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होऊन जाम लागतो. शिवाय ध्वनी व वायू प्रदूषण सुद्धा वाढते. फेरीवाल्यांना हा परिसर प्रतिबंधित असून देखील पालिकेच्या आशीर्वादाने सर्रास फेरीवाले , टपरी वाले तसेच पत्र्याच्या शेड मधील दुकानांची बेकायदा कामे होऊन सुद्धा त्याला संरक्षण दिले जात आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी येथील वाहतूक कोंडी प्रकरणी पालिका व पोलीस अधिकारी यांची बैठक घेतली होती . परंतु आजही पालिका आणि पोलिसांनी त्यावर जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली आहे.