लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः लाल बहादूर शास्त्री मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. कुर्ला, कमानी आणि कुर्ला डेपो या परिसरात सकाळपासून झालेली वाहतूककोंडी दुपारनंतरही कायम होती.
मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले होते. बहुतांश रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाहने नेताना चालकांना कसरत करावी लागत होती. दुचाकी आणि लहान वाहने मध्येच बंद पडत असल्याने, वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. लाल बहादूर शास्त्री मार्गावर तर दुपारनंतरही पाणी साचले होते. रस्त्यांवर बेस्टच्या बसचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सर्वच बेस्ट बस स्टॉपवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सायन आणि कुर्ला येथे मोठ्या अडचणी येत होत्या. बहुतांश नागरिकांनी जवळचा प्रवास पायी करणे पसंत केले.
दुपारी ३ नंतर पावसाचा जोर कमी झाला आणि रस्त्यांवर साचलेले पाणी हळूहळू ओसरू लागले. त्यानंतर, विस्कळीत झालेली मुंबई हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र, दाटून आलेले काळेकुट्ट ढग दूर झाले नसल्याने मुंबईकरांच्या मनात पावसाची धडकी कायम होती.