पडघा टोल नाका येथे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:06 AM2020-12-26T04:06:50+5:302020-12-26T04:06:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाका येथे शुक्रवार सकाळपासून प्रचंड ...

Traffic congestion at Padgha Toll Naka | पडघा टोल नाका येथे वाहतूककोंडी

पडघा टोल नाका येथे वाहतूककोंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाका येथे शुक्रवार सकाळपासून प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने चालक कमालीचे हैराण झाले होते. टोल वसुली करणाऱ्या कंपनीने कोंडी सोडविण्यासाठी कोणतेही नियोजन केले नसल्याने प्रवाशांमध्ये टोल कंपनीविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता.

काही महिन्यांपूर्वी याच टोल नाक्यावर वाहतूककोंडीत अडकल्याने एका नागरिकाला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूला कवटाळावे लागले. मात्र त्याचा कोणताही परिणाम टोल कंपनीवर झालेला दिसत नाही. त्याचबरोबर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्यास पिवळ्या पट्यातील वाहनांना टोल न आकारता सोडण्यात यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिलेले असतानाही सरकारच्या या नियमांकडे टोल कंपनीने पुरते दुर्लक्ष केले असून टोल वसुलीच्या लालसेपोटी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याने नागरिकांसह प्रवाशांकडून टोल कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

25 bhiwandi toll naka

फोटो ओळ : मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाका येथे शुक्रवारी वाहनांची लागलेली रांग. (छाया : नितीन पंडित)

वाहतूककोंडीचा मंत्र्यांनाही बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

कसारा : सलग सुट्ट्यांमुळे हजारो मुंबईकर घराबाहेर पडल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. गुरुवारी रात्रीपासून मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांची गर्दी वाढत होती. शुक्रवारी सकाळी सहापासून महामार्ग चार तास विस्कळीत झाला होता. कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या कोंडीचा फटका मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला. त्यांचा ताफा या कोंडीत तासभर अडकला होता. पुढे घोटी टोल नाक्यावर ताफा येताच भुजबळ हे स्वतः खाली उतरले व टोल फ्री करून वाहनांना वाट मोकळी करून दिली.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, सहायक पोलीस अधिकारी गणेश माळी, महामार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल वालझाडे आपल्या कर्मचाऱ्यांसह तब्ब्ल दोन तास कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. वालझाडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन तब्बल पाच किलोमीटर चालत जाऊन वाहतूक सुरळीत केली.

25 kasara traffic

फोटो ओळ : कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा.

---------------------------------------

कळंबोली सर्कलवर वाहतूककोंडी

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कलजवळ शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने कळंबोली सर्कलजवळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाले. सायन-पनवेल महामार्गावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यातच वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांत पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने कळंबोली सिग्नलवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पर्यटकांची पालघरमध्ये गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर पर्यटक जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या मूडमध्ये असतानाच मुंबईमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे मजा करण्यास मुकणार असल्याने ख्रिसमसमुळे सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी मुंबई, नाशिक आदी भागांतून शेकडो पर्यटक जिल्ह्यातील केळवे, बोर्डी, दातीवरे आदी भागांत दाखल झाले आहेत. २५ डिसेंबर - ख्रिसमस आणि सलग आलेल्या शनिवार, रविवार अशा तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कोरोनाकाळात घरात अडकून पडलेली अनेक कुटुंबे जिल्ह्यातील ११० किमीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या पर्यंटनस्थळांवरील रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये दाखल झाली आहेत.

मुंबई-गाेवा महामार्गावर वाहनांच्या रांगा

लाेकमत न्यूज नेटवर्क

रायगड : सलग आलेल्या सुट्ट्या एन्जाॅय करण्यासाठी माेठ्या संख्येने पयर्टक काेकणात दाखल हाेत आहेत. एकाच वेळी माेठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने मुंबई-गाेवा महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या हाेत्या. त्याचप्रमाणे पुण्याकडे जाण्यासाठी खालापूर टाेल नाक्यावर वाहनांची प्रचंड गर्दी दिसून आली. रायगड जिल्ह्यातून प्रामुख्याने मुंबई-गाेवा महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जाताे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकही माेठ्या संख्येने बाहेर पडले हाेते. त्यामुळे तिन्ही महामार्ग पयर्टकांच्या वाहनांनी गजबजून गेले हाेेते. वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत असल्याने प्रवासीही त्रस्त झाले हाेते. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे, कल्याण येथील पर्यटक माेठ्या संख्येने सकाळीच बाहेर पडले. एकाच वेळी हजाराेंच्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहनांच्या सुमारे दाेन किलाेमीटरपर्यंत रांगा लागल्या हाेत्या. रायगडसह रत्नागिरी जिल्ह्याकडे ही वाहने जात असल्याने मुंबई-गाेवा महामार्गावर प्रचंड गर्दी झाली हाेती. काही ठिकाणी रस्ता खराब असल्याने आणि रस्त्यांचे काम सुरू असल्याने वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत हाेती.

Web Title: Traffic congestion at Padgha Toll Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.