Join us

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार; नरिमन पॉईंट ते कुलाबा नवीन पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 2:33 AM

दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या सुखद प्रवासासाठी प्राधिकरणाने नरिमन पॉईंट ते कुलाबा नवीन पूल प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नरिमन पॉईंट ते कुलाबा हा नवीन पूल प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या सुखद प्रवासासाठी प्राधिकरणाने नरिमन पॉईंट ते कुलाबा नवीन पूल प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. प्राधिकरणाकडील परिवहन अभ्यास २००५ - २००८ मध्ये करण्यात आला होता. अहवालामध्ये नरिमन ते कुलाबा यांना जोडणारा मार्ग प्रस्तावित करण्यात आला. सद्यस्थितीत नरिमन पॉईंट येथून कुलाब्याला जाण्याकरिता कॅप्टन प्रकाश पेठे हा एकमेव मार्ग आहे. येथे मोठी कोंडी होते. परिणामी प्राधिकरणाच्या वतीने नरिमन पॉईंट ते कुलाबा हा नवीन पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर पुलाची लांबी १.६ किलोमीटर असणार आहे. 

नवीन प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांचे नुकसान होणार नसून याची काळजी घेण्यात येईल. त्यांच्या बोटी ये-जा करता कोणताही अडथळा निर्माण होणार नाही ; याची दक्षता घेऊनच पुलाची संरचना करण्यात  येणार आहे. जैविकतेचा अभ्यास सल्लागारांकडून करण्यात येणार आहे.- आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

सल्लागारांमार्फत प्रकल्पाचे आरेखन, मार्गिका, विविध प्रकारचे वाहतूक सर्वेक्षण, प्रकल्पाची अंदाजे रक्कम, अंलबजावणीची योजना तसेच आवश्यक सर्व परवानग्या आदी बाबत सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. ४ महिन्यांत काम पूर्ण होईल.