दादर टीटी पुलावरील वाहतूककोंडीला उतारा मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:23 AM2018-05-01T05:23:50+5:302018-05-01T05:23:50+5:30
दादर... शहरातील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या ठिकाणांपैकी एक.
मुंबई : दादर... शहरातील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या ठिकाणांपैकी एक. दादर स्थानकाला पूर्व-पश्चिम जोडणारा दुवा असलेल्या लोकमान्य टिळक पुलावर सर्वाधिक कोंडी पाहायला मिळते. मात्र, ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी शासन दरबारी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे दादरच्या वाहतूककोंडीला उतारा मिळेल का, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.
दादरमधील वाढती लोकसंख्या, वाहनसंख्या, वाढणारे औद्योगिकीकरण, कार्यालयांची वाढणारी संख्या वाहतूककोंडीमागचे मुख्य कारण आहे. तसेच दादर परिसरात पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी केवळ एकमेव पूल असल्याने या पुलावर सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १०.३० वाजेपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी होते. अवघ्या दोन ते तीन मिनिटांचा पूल ओलांडण्याकरिता २० ते ३० मिनिटे लागतात.
दादर येथील लोकमान्य टिळक पूल हा जवळपास ९८ वर्षे जुना आहे. ९८ वर्षांपूर्वी दादर आणि एकंदर मुंबईची लोकसंख्या सध्याच्या तुलनेत खूपच कमी होेती. मुंबईत वाहनेदेखील कमी होती. त्या तुलनेत आता वाहनांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे. अशा वेळी हा पूल अपुरा पडत आहे. शिवाय हा जुना पूल आता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने टिळक पुलासाठी पर्यायी व्यवस्था करून द्यायला हवी किंवा टिळक पुलाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी दादरकर वारंवार करत आहेत; परंतु प्रशासन त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे.