Join us

रस्त्यांच्या परिस्थितीस वाहनांची घनता जबाबदार, मुंबई पालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 8:31 AM

मुंबईत प्रति किलोमीटर २ हजार १८३ वाहने इतकी वाहनांची घनता असल्याचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

मुंबई : शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी उत्कृष्ट दर्जाची सामुग्री वापरली, तरी रस्त्यांची परिस्थिती खराब होतेच. मुंबईत प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडतो, तसेच मुंबईतील वाहनांची घनताही रस्त्याच्या दुर्दशेस जबाबदार आहे. मुंबईत प्रति किलोमीटर २ हजार १८३ वाहने इतकी वाहनांची घनता असल्याचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिलेल्या आदेशानुसार, शहर खड्डेमुक्त ठेवण्यात मुंबई महापालिका अयशस्वी ठरल्याने त्यांच्यावर अवमानाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका व्यवसायाने वकील असलेल्या रुजू ठक्कर यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या.अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. बुधवारच्या सुनावणीत मुंबई महापालिकेने वरीलप्रमाणे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. 

महापालिका म्हणते...महापालिकेने मुंबईच्या रस्त्यांच्या दुर्दशेस कारणीभूत असलेल्या घटकांची माहिती दिली आहे. मुंबईत काही आठवडेच पाऊस पडत असला, तरी तो मुसळधार असल्याने रस्ते दुरुस्तीसाठी उत्कृष्ट दर्जाची सामुग्री वापरली, तरी त्या पावसापुढे ती टिकाव धरत नाही, असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याशिवाय मुंबईत दररोज ६ लाख ११ हजार वाहने मुंबई प्रवेश करतात आणि जातात, तसेच १ जानेवारी, २०२३ रोजी मुंबईतील वाहतुकीत तब्बल ४४ लाख ७६ हजार वाहने असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे वाहतुकीवरील ताण वाढतो. परिणामी, त्याचा रस्त्यांच्या स्थितीवर परिणाम होता, असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका