मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीचे तीनतेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 04:35 AM2018-07-13T04:35:13+5:302018-07-13T04:35:38+5:30
भर पावसाळ्यातही विनाअडथळा मेट्रोची कामे सुरू राहतील. पण या कामांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, अशी घोषणा मेट्रो प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केली होती.
- अजय परचुरे
मुंबई : भर पावसाळ्यातही विनाअडथळा मेट्रोची कामे सुरू राहतील. पण या कामांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, अशी घोषणा मेट्रो प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केली होती. मात्र शनिवारपासून सलग ४ दिवस मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मेट्रो प्रशासनाची ही घोषणा पाण्यात बुडाली आहे. मुंबईभर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे जागोजागी वाहतूककोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे जागोजागी साचलेले पाणी आणि त्यात मेट्रो प्रकल्पांच्या कामांमुळे अडवणूक झालेल्या रस्त्यांमधून वाट काढता काढता मुंंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
मुंबईत सध्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावर मेट्रो-३ प्रकल्पाचे भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर सध्या ५ किलोमीटरचे भुयारीकरणाचे काम मेट्रोने पूर्ण केले आहे. मेट्रोचे काम ज्या मार्गावर सुरू आहे तिथे रस्त्यांवर मेट्रोने मोठेमोठे बॅरिकेट्स उभे केले आहेत. वरळी नाका हा याच मार्गावरील अतिशय गजबजलेला परिसर. मात्र या ठिकाणी मेट्रो-३च्या कामामुळे वरळी नाक्यावरील अॅनी बेझंट रोडवर दिवसभर वाहतूककोंडीचे चित्र सध्या दिसत आहे. वरळीपासून महालक्ष्मी, भायखळा परिसरात जाण्यासाठी वाहनाने १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र या
रोडवर सर्वत्र मेट्रो-३च्या कामामुळे लोखंडी बॅरिकेट्सनी अर्धा रस्ता व्यापून टाकला आहे. त्यामुळे हे
अंतर कापण्यास वाहनचालकांना पाऊण तासाचा वेळ लागत आहे.
या मार्गावर महपालिकेचे
आॅफिस आहे. अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये आहेत. येथे काम करणाºया कर्मचाºयांनाही कोंडीतून मार्ग काढत कार्यालय गाठावे
लागत आहे. त्यात मुसळधार
पाऊस पडल्यावर रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना या मार्गावरून वाहन घेऊन जाण्यासाठी बºयाच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तर संध्याकाळी वाहनांच्या रांगाच रांगा या मार्गावर दिसतात.
पश्चिम उपनगरातही हीच परिस्थिती आहे. दहिसर पश्चिम ते डी. एन. नगर या मार्गावर ‘मेट्रो २ अ’
च्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तर अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गावर मेट्रो ७चे काम सध्या
सुरू आहे. एमएमआरडीएचा अधिभार स्वीकारल्यानंतर आयुक्त आर.
ए. राजीव यांनी तातडीने या प्रकल्पांना भेटी देत पावसाळ्यात या मार्गावर मेट्रोच्या कामांमुळे कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊ
नये यासाठी प्रशासनाने नेमलेल्या कंत्राटदारांना कडक शब्दांत
समज दिली होती. या मार्गावर वाहतूककोंडी होणाºया ठिकाणचे काम पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पण जेव्हीएलआर, अंधेरी, सांताक्रुझ, डी. एन.
नगर भागात या कंत्राटदारांनी आपल्या कामात कसूर केल्यामुळे
येथेही वाहतूककोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा
लागत आहे. शनिवारपासून सलग
चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि मेट्रो कामातील असुविधेचा सर्वांत जास्त फटका
हा पश्चिम उपनगरातील रस्त्यांना बसला आहे.
पहिल्याच मुसळधार पावसामुळे या मार्गावर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही तयारी मेट्रो प्रशासनाने नेमलेल्या कंत्राटदारांनी केलेली नव्हती. एमएमआरडीएचे आयुक्त आर.
ए. राजीव यांनी जातीने लक्ष
घालूनही कंत्राटदारांनी त्यांचे
आदेश धाब्यावर बसवल्याने
याचा फटका मुंबईकरांसह वाहनचालकांना बसला आहे.
कामे न केल्याने बसतोय फटका
मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आपल्या कंत्राटदारांना पावसाळ्यातील कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यात पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई कामे, पर्जन्य जलवाहिन्या वळविण्याची कामे, पाण्याचा निचरा करणाºया पंपाची व्यवस्था करणे इत्यादी कामे कॉर्पोरेशनद्वारे कंत्राटदारांना देण्यात आली होती. मात्र मेट्रो प्रकल्पांच्या मार्गावरील ही कामे कंत्राटदारांनी केलीच नसल्याचे चित्र गेल्या ४ दिवसांच्या वाहतूककोंडीने स्पष्ट झाले आहे.
वरळी नाक्यावरील अॅनी बेझंट रोडवर दिवसभर वाहतूककोंडीचे चित्र सध्या आहे.
वरळीपासून महालक्ष्मी, भायखळा परिसरात जाण्यासाठी वाहनाने १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो.
पश्चिम उपनगरातही जेव्हीएलआर, अंधेरी, सांताक्रुझ, डी.एन. नगर भागात या कंत्राटदारांनी आपल्या कामात कसूर केल्यामुळे येथेही वाहतूककोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
शनिवारपासून सलग चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि मेट्रो कामातील असुविधेचा सर्वांत जास्त फटका हा पश्चिम उपनगरातील रस्त्यांना बसला आहे.