मुंबई : लोकलच्या टपावरून प्रवास करणाऱ्यांची धरपकड पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) केली जात आहे. त्यासाठी व्हिडीओ शूटिंगचा आधार घेतला जात असतानाच आता मध्य रेल्वे सुरक्षा दलाने नवी शक्कल लढवली आहे. टपावरून प्रवास करणाऱ्यांचा मोबाइलवरून फोटो काढून तो पुढील अन्य स्थानकांवरील आरपीएफ कर्मचाऱ्यांना पाठविला जाईल. त्यामुळे टपावरून प्रवास करणारा प्रवासी सहज पकडला जाईल. या कारवाईला मध्य रेल्वे आरपीएफकडून सुरुवात करण्यात आली आहे. लोकलच्या टपावरून किंवा दरवाजाजवळ उभे राहून स्टंट करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात आहे. १ जुलैपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून १५ जुलैपर्यंत ती चालणार आहे. टपावरून प्रवास करणाऱ्यांचे शूटिंग करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वे सुरक्षा दलानेही लोकलच्या टपावरून प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. १ जुलैपासून ५९ जणांची धरपकड करण्यात आली आहे. मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले की, यात व्हॉट्सअॅपची मदत होत आहे. प्रवासी टपावरून प्रवास करताना दिसला आणि पकडणे अशक्य असले तर त्याचा फोटो काढला जातो. हा फोटो व्हॉट्सअॅपद्वारे पुढील स्थानकांवर असणाऱ्या अन्य आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना पाठवला जातो.
व्हॉट्सअॅपमार्फत टपावरील प्रवाशांची धरपकड
By admin | Published: July 06, 2016 2:48 AM