मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ अशी ओळख असेलल्या मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या सेवांमध्ये कपात करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. यामुळे किमान ४० विमान सेवा रद्द होणार असल्याची माहिती आहे. यामुळे उपलब्ध विमानसेवांना उड्डाणाचा विलंब टाळता येणार असला तरी विमानांची संख्या कमी होणार असल्यामुळे प्रवासाचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मुंबई विमानतळावर दिवसाकाठी ९५० च्या आसपास विमानांची आवकजावक होते. गेल्या वर्षी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येने विक्रमी टप्पा पार करतानाच प्रवासी संख्येनेदेखील ४ कोटींचा टप्पा पार केला आहे. ही वाढती गर्दी हाताळण्यात विमानतळावर उपलब्ध पायाभूत सुविधा कमी पडताना दिसत आहे. यामुळे विमानाला विलंब होण्यापासून ते रद्द होण्यापर्यंत अनेक गोष्टी घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर नियमित विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांना मुंबईतून विमान सेवेत कपात करण्याची सूचना केली आहे. प्राप्त माहितीनुसार, विमान प्रवासात देशात अव्वल कंपनी असलेल्या इंडिगो कंपनीतर्फे १८ विमाने कमी करण्यात येतील, तर एअर इंडिया समूहातील १७ विमाने रद्द करण्यात येतील, तर अन्य कंपन्यांची पाच विमाने रद्द होतील.
मुंबई विमानतळावरील व्यस्त वाहतुकीमुळे आजवर अशा खाजगी विमानांना सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत उड्डाण अथवा लँडिंगसाठी बंदी होती. मात्र, आता या कालावधीमध्ये वाढ केली असून, खासगी विमानांना आता चारऐवजी आठ तास उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर चार्टर विमानांचेदेखील उड्डाण होते. या विमानांच्या सेवेवरदेखील निर्बंध लादले आहेत. यामुळे ही विमाने सकाळी ८ ते ११, सायंकाळी ५ ते ८ आणि रात्री ९:१५ ते ११:१५ या कालावधीमध्ये उड्डाण करू शकणार नाहीत.