रमझानच्या गर्दीला टार्गेट करून लुटणारे गजाआड
By admin | Published: June 21, 2017 03:58 AM2017-06-21T03:58:20+5:302017-06-21T03:58:20+5:30
रमझानमधील गर्दीला टार्गेट करून त्यांचा किमती ऐवज लुटणाऱ्या अहमदाबादच्या त्रिकूटाला पायधुनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रमझानमधील गर्दीला टार्गेट करून त्यांचा किमती ऐवज लुटणाऱ्या अहमदाबादच्या त्रिकूटाला पायधुनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुमताज शेख, सायरा आणि फिरोज अशी अटक आरोपींची नावे आहेत.
नाशिकच्या रहिवासी असलेल्या अॅड. कामिनी खेरुडकर १० जून रोजी आई आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत पायधुनी परिसरात आल्या होत्या. त्याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत त्यांची बॅग लंपास करण्यात आली. त्यांनी तत्काळ पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान १२ जून रोजी पायधुनी पोलीस येथील परिसरात गस्त घालत असताना मुमताजच्या संशयास्पद हालचाली त्यांनी हेरल्या. मुमताजला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तिच्या झडतीत एक ब्लेड पोलिसांनी हस्तगत केले. तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्यांची कबुली दिली. खेरुडकर यांची पर्सदेखील तिनेच लंपास केल्याचे समोर आले. तिच्या चौकशीत सायरा आणि फिरोजचे नाव समोर आले. त्या दोघांनाही पोलिसांनी येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १८ हजारांची रोकड आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तिघेही आरोपी अहमदाबादचे आहेत़