माथेरान - दिवाळी साजरी करण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने रविवारी माथेरानची वाट धरली. मात्र सकाळपासूनच नेरळ-माथेरान घाटात अचानक वाहनांची गर्दी वाढल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या परिस्थितीत अनेक पर्यटकांवर माघारी परतण्याची नामुष्की पत्करावी लागली.
दिवाळी हा माथेरानचा सर्वात मोठा पर्यटन हंगाम असतो. यंदाही त्याचा प्रत्यय आला. लक्ष्मीपूजन झाल्यापासून या स्थळाकडे मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरातील हजारो पर्यटकांची रांग येथे लागली. रविवारी सकाळी यामुळे घाटमार्गात वाहतूक कोंडी झाली. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पार्किंगची पुरेशी सोय नसल्याने अनेकांना माघारी परतावे लागले. घाटात कोंडी झाल्याने लहान मुलांना घेऊन तासनतास ताटकळत राहावे लागले. काही पर्यटक तर घाटातून पायी चालत दस्तुरी नाक्यावर आले.
पार्किंग सुविधेबाबत कल्पना असतानाही पालिका प्रशासनाने त्यावर काहीही ठोस उपाययोजना न केल्याने हा फटका बसल्याचे आता बोलले जात आहेत. वाहतूक कोंडीमुळे काही पर्यटकांनी कर्जत तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये आणि लोणावळा, खंडाळा येथे जाणे पसंत केल्याचे दिसत होते.
पहिल्यांदाच माथेरानमध्ये आलो. पण, घाटातील वाहतूककोंडीचे विदारक चित्र पाहून घोडचूक केली असे वाटले. जग फिरलो, पण अशी भयानक परिस्थिती कुठेच अनुभवायला मिळाली नाही. यासाठी सरकारने येथे पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.- अभिराज सोनटक्के, पर्यटक, मुंबई