सायन-पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ मोठी गॅस दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 09:30 AM2018-08-11T09:30:40+5:302018-08-11T09:36:46+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे सायन–पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव कंटेनरने गॅस टँकरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. गॅस गळतीची शक्यता निर्माण झाल्यामुळे संपूर्ण परिसरावर तीन तास धोक्याचे सावट पसरले होते. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर शनिवारी (11 ऑगस्ट) सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
सानपाडा पुलावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अत्यंत ज्वलनशील प्रोपेन गॅस घेऊन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला कंटेनरने मागून धडक दिली. यावेळी कंटेनर हटवल्यास गॅस टँकरचा वॉल तुटून गॅस गळतीची शक्यता निर्माण झाली होती. या गॅसची गळती झाली असती तर मोबाईलच्या रेंजने सुद्धा स्फोट होण्याची शक्यता होती. तसेच असे झाले असते तर पुलासह संपूर्ण परिसरात अग्नितांडव झाले असते. त्यामुळे वाहतूक पोलीस व वाशी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही दिशेची वाहतूक तात्काळ बंद केली होती.
अपघातग्रस्त कंटेनर बाजूला हटवताना गॅस टँकरचा वॉल तुटण्याची शक्यता होती असे अग्निशमन अधिकारी व्ही. व्ही. म्हात्रे यांनी सांगितले. यामुळे गॅस टँकरचा वॉल बंद करण्यासाठी बाहेरुन तज्ञ बोलावण्यात आला. अखेर शनिवारी (11 ऑगस्ट) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तज्ञ व्यक्तीने गॅस टँकरच्या वॉलची पाहणी करून तो बंद केला. त्यानंतर सात वाजण्याच्या सुमारास कंटेनर बाजूला काढून गॅस टँकर पुलावरून हलवण्यात आला. यादरम्यान सुमारे तीन तास मुंबई पुणे मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.