नाकेबंदीमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:01+5:302021-06-02T04:06:01+5:30
मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन नियम शिथिल करण्यात आले आहेत. अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होताच, मुंबईतील ...
मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन नियम शिथिल करण्यात आले आहेत. अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होताच, मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली. लोकल बंद असल्याने रस्ते मार्ग हा पर्याय आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वच प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
मुंबईत विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. मुंबईत लॉकडाऊन निर्बंध शिथिल केल्यानंतर सोमवारी रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे मंगळवारी विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.
अकुर्ली मेट्रो स्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. वेस्टर्न एक्स्प्रेस वे वरील वाहतूक २५ टक्क्यांनी वाढली. विनाकारण वाहतुकीला लगाम लावण्यासाठी मंगळवारी नाकेबंदी करण्यात आली, असे वाहतूक पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे म्हणाले, तसेच वाहनचालक योग्य कारणासाठी घराबाहेर पडले आहेत का हे पाहण्यासाठी सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. मंगळवारी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली, पण सोमवारच्या तुलनेत कमी होती. नाकाबंदी असल्याने वाहनांना योग्य कारण नसेल तर घरी परत पाठवले किंवा त्यांनी वेगळ्या मार्गाने गेले. अनेक वाहने दोन तासांहून अधिक काळ थांबली होती. पोलिसांनी कडक तपासणी केली. यामध्ये रुग्णवाहिकेचाही समावेश आहे, असेही ते म्हणाले.
दहिसर टोल नाक्यासाठी वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या उत्तर वाहिनीवर ४ किमीपर्यंत वाहतूक कोंडी होती. वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या प्रत्येक उड्डाणपुलाच्या पूर्वी आणि नंतर नाकाबंदी होती. १०० मीटर टोलचा नियम कुठे आहे असा सवाल एका वाहनचालकाने विचारला आहे. दहिसर आणि मिरा रोड ४५ मिनिटे वाहतूक कोंडीत अडकलो, जर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकत असेल तर काय फायदा, असा सवाल मितेश शाह यांनी विचारला. पालिकेने सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मुलुंड नाक्याजवळ वाहतूक कोंडी झाली होती. एक-दोन तास वाहतूक कोंडीत गेले. कामे कधी करणार, कमीत कमी रेल्वे प्रवासाची मुभा द्या, असे एका वाहनचालकाने म्हटले आहे.