Join us  

मुंबईत रॅलीमुळे वाहतूक कोंडी; वाहनचालक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:10 AM

मुंबई : मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद रॅली गुरुवारपासून सुरू झाली. त्यामुळे विविध भागात वाहतूक ...

मुंबई : मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद रॅली गुरुवारपासून सुरू झाली. त्यामुळे विविध भागात वाहतूक ठप्प होत आहे. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.

एकीकडे राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन अजूनही बंधनकारक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांची निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रातील भाजपचे सर्व नवे मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढून नागरिकांशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे.

या यात्रेमुळे विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत वाहनचालक अमित सुर्वे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्यात आले होते. रुग्ण कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला; पण रॅलीमुळे गर्दी होत आहे. कोरोना पसरण्याचा धोका आहे. या रॅली बंद केल्या पाहिजेत.

वाहनचालक संतोष झरेकर म्हणाले की, नेत्यांनी कोरोनाचे भान ठेवले पाहिजे. मंत्र्याचा दौरा असेल तर काही रस्ते बंद केले जातात. काही ठिकाणी वनवे असतो. १० मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते एक तास लागतो.

तर वाहनचालक निखिल शेळके म्हणाले की, एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांना मर्यादा आहेत. सामान्य माणसांच्या कार्यक्रमांना नियम आहेत आणि नेत्यांना सवलत आहे. त्यांच्या रॅलीमध्ये इतकी गर्दी होते तर तिथे कोरोना पसरत नाही का, असा सवाल त्यांनी विचारला.