Join us

रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 5:34 AM

गेले काही दिवस इथल्या अनेक भागातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भर रस्त्यांवरच निघणारे रोड शो, रथयात्रांमुळे मुंबईकरांना गेले काही दिवस ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हजेरी या यात्रांना लागणार असेल तर वाहतुकीचे नियोजन करता करता बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे.

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, लिंक रोड, एलबीएससारख्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी असते. शिवाय अंतर्गत रस्तेही सकाळ-संध्याकाळ वाहतुकीच्या कोंडीने जाम झालेले दिसतात. त्यात अनेक उमेदवारांचा प्रचारासाठी रेल्वे स्टेशन, भाजी मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी रोड शो किंवा यात्रा काढण्यावर भर असतो. या यात्रांमुळे वाहतूक कोंडी आणखी वाढते. उत्तर मुंबईत भाजप आणि काँग्रेसच्या वतीने दिवसातून एक किंवा दोन रोड शो होत आहेत. त्या निमित्ताने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा केली जाते. कार्यकर्ते पायी चालत असले तरी अनेकांच्या बाइक, गाड्या या वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे गेले काही दिवस इथल्या अनेक भागातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

प्रचार सुरू झाल्यापासून येथील उमेदवारांकडून दिवसाला दोन प्रचार यात्रा कधी रोड शो, कॉर्नर सभा आयोजित केल्या जात आहेत. खेरवाडी सिग्नल, वांदे स्थानक, कुर्ला- बीकेसी, कलानगर, वाकोला सिग्नल येथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे.

व्हीआयपी मंडळींची ये-जा

उपनगर आणि मुंबई शहराला जोडणाऱ्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातही वाहतूक कोंडीचा अनुभव येत आहे. आधीच या मार्गावर कायम रहदारी असते. शिवाय उपनगर जिल्हाधिकारी तथा निवडणूक कार्यालयदेखील येथेच असल्याने उमेदवारांनी अर्ज भरते वेळी या भागात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. तसेच या मतदारसंघात विमानतळ असल्याने देशभरातून येणाऱ्या व्हीआयपी मंडळींची ये-जा या परिसरातून होत असते. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४वाहतूक कोंडी