Join us  

प्रवाशांचे ठिय्या आंदोलन

By admin | Published: February 17, 2016 3:03 AM

रूळ ओलांडताना गौरव व्होरा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर, सँडहर्स्ट स्थानकातील प्रवाशांच्या संतापाचा चांगलाच कडेलोट झाला.

मुंबई: रूळ ओलांडताना गौरव व्होरा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर, सँडहर्स्ट स्थानकातील प्रवाशांच्या संतापाचा चांगलाच कडेलोट झाला. साधारणपणे दुपारी दोनच्या सुमारास रुळावरून स्थानिकांना बाजूला हटविण्यात आल्यानंतरही स्थानिक सँडहर्स्ट रोड स्थानकात ठाण मांडून बसले होते. हँकॉक पूल तोडण्यापूर्वी पालिका आणि रेल्वेने स्थानिकांना पर्यायी मार्ग दिला पाहिजे होता. मात्र, त्याचे नियोजनच केले नसल्याने, रूळ ओलांडावा लागत असल्याचा आरोप करत, यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत होती. यावरून पोलीस आणि स्थानिकांमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत स्थानकात चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी सकाळी अकरा वाजता पालिकेचे अभियंता चर्चेसाठी सँडहर्स्ट रोड स्थानकात येणार असल्याचे सांगत, त्यांची समजूत काढण्यात आली. नंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.रूळ ओलांडताना महिन्याभरात चार जणांचा मृत्यू सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल १0 जानेवारी २0१६ रोजी तोडण्यात आला. हा पूल तोडण्यात आल्याने, स्थानिकांकडून रूळ ओलांडून जावे लागत आहे. १६ जानेवारीपासून ते आतापर्यंत रूळ ओलांडताना लोकलच्या धडकेत हँकॉक पुलाजवळच चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पूल लवकरच बांधण्याची मागणी केली जात आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील १३६ वर्षे जुना हँकॉक पूल पूर्णपणे तोडल्यानंतर नवीन हँकॉक पूल कधी उभारणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नवीन हँकॉक पूल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नियोजन करण्यात आले असून, दोन वर्षांत तो साकारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी साधारण ३० कोटी रुपये खर्च येईल.शिवाजी शिंदे (सीएसटी-लोहमार्ग-वरिष्ठ पोलीस निरीक्षक)- लोकलच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांकडून ‘रेल रोको’ करण्यात आला. हँकॉक पूल पाडल्याने स्थानिकांना धोकादायकरीत्या रूळ ओलांडावा लागत आहे. त्यामुळे पर्यायी किंवा त्वरित कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी रेल रोको करण्यात आला. मात्र, त्यांची समजूत काढण्यात आली असून, या संदर्भात बुधवारी पालिका अभियंता आणि स्थानिक यांच्यात चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)