मुंबईतील वाहतूककोंडीवर उतारा
By admin | Published: March 4, 2016 02:09 AM2016-03-04T02:09:13+5:302016-03-04T02:09:13+5:30
मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी या शहराच्या प्रगतीआड येणाऱ्या वाहतूककोंडीवर उतारा असलेल्या आराखड्याचा मसुदा अखेर तयार झाला आहे़
मुंबई : मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी या शहराच्या प्रगतीआड येणाऱ्या वाहतूककोंडीवर उतारा असलेल्या आराखड्याचा मसुदा अखेर तयार झाला आहे़ मात्र, गेली आठ वर्षे संथ गतीने या अॅक्शन प्लॅनवर काम सुरू राहिल्याने याचा खर्च १३ हजार कोटींवर पोहोचला आहे़ यामध्ये प्रामुख्याने रस्ते व महामार्गांच्या मजबुतीकरणावर भर देण्यात येईल.
मुंबईत खासगी वाहनांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याने, वाहतूककोंडीची मोठी समस्या शहराला भेडसावत आहे़ त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याकरिता पालिकेने २००८ मध्ये अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे काम हाती घेतले़ मात्र, अनेक वेळा या प्लॅनमध्ये सुधारणा होत, आठ वर्षे लोटली़ त्यामुळे आता हा
प्लॅन अमलात आणण्यासाठी
तब्बल १३ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे़ याबाबतचे सादरीकरण पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत आज केले़
या आराखड्यातून सार्वजनिक वाहतुकीला स्वतंत्र मार्गिका, वाहतूककोंडीसाठी शुल्क व पार्किंगचे दर वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे़, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर या अॅक्शन प्लॅनमुळे राजकीय पक्षांची कोंडी होणार असल्याने, यास विरोध होण्याची शक्यताच अधिक आहे़ (प्रतिनिधी)