मुंबई विमानतळावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:13+5:302021-07-10T04:06:13+5:30

मुंबई : दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे घसरलेला हवाई प्रवासी संख्येचा आलेख हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येत ...

Traffic at Mumbai Airport gradually resumed | मुंबई विमानतळावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

मुंबई विमानतळावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

Next

मुंबई : दुसऱ्या लाटेच्या प्रकोपामुळे घसरलेला हवाई प्रवासी संख्येचा आलेख हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येत मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात ६० टक्क्यांची वाढ नोंदविल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

जानेवारी ते जूनपर्यंत म्हणजे गेल्या सहा महिन्यांत मुंबई विमानतळावरून जवळपास ७२ लाख ६१ हजार १५८ प्रवाशांनी प्रवास केला. त्यांच्या सेवेकरिता ७७ हजार ७९८ विमाने हवेत झेपावली. त्यात देशांतर्गत प्रवाशांची संख्या ६४ लाख ८७ हजार ६६, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या ७ लाख ७४ हजार ९२ इतकी नोंदविण्यात आली. याकाळात देशांतर्गत मार्गावर ६३ हजार ९९२, तर आंतरराष्ट्रीय मार्गावर १३ हजार ८०५ विमानांनी उड्डाण केले.

यंदाही दुबईला मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती दर्शविली असून, एकूण आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी २ लाख १३ हजार ७७० प्रवाशांनी मुंबई विमानतळावरून दुबईवारी केली. त्याखालोखाल न्यूयॉर्क ८८ हजार १०, तर ब्रिटनमधील हीथ्रो विमानतळावर मुंबईहून ७५ हजार ४७० दाखल झाले. देशांतर्गत प्रवाशांचा विचार करता मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक ९ लाख ४६ हजार ८९० इतकी नोंदविण्यात आली. त्याखालोखाल गोवा ५ लाख ४२ हजार ३५०, तर बंगळुरूला ४ लाख ३२ हजार १८० जणांनी ये-जा केली.

हवाई वाहतूक क्षेत्राला बळ देण्यासाठी मुंबई विमानतळावरून काही नवीन ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यात दरभंगा, अदमपूर आणि कलबुर्गी या देशांतर्गत; तर बाटम, अर्मेनिया, मियामी आणि ह्यूस्टन या आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे.

दिवसभरात किती विमाने उड्डाण घेतात?

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की प्रवासी संख्येअभावी विमान प्रचलनावरही परिणाम होतो. गेल्यावर्षी मे महिन्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू केल्यानंतर मुंबई विमानतळावरून ५० उड्डाणांना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १००, २०० अशी संख्या वाढविण्यात आली. दुसरी लाट ओसरल्यानंतर येथून दिवसभरात ४०० ते ५०० नियोजित उड्डाणे होत आहेत. या विमानतळावरून ५४ देशांतर्गत, तर २१ आंतरराष्ट्रीय मार्गांवर नियमित सेवा देण्यात येत आहे.

- मुंबई विमानतळावरील एकूण प्रवासी : ७२ लाख ६१ हजार १५८

- देशांतर्गत : ६४ लाख ८७ हजार ६६,

- आंतरराष्ट्रीय : ७ लाख ७४ हजार ९२

- सहा महिन्यांतील विमान उड्डाणे - ७७ हजार ७९८

Web Title: Traffic at Mumbai Airport gradually resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.