लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा जोर ओसरताच सोमवारी रात्री १० नंतर मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मंगळवारी गुजरात वगळता अन्य विमानसेवा सुरळीत सुरू होत्या.
सोमवारी चक्रीवादळ मुंबईच्या जवळ पोहोचल्यानंतर सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबई विमानतळ तब्बल ११ तास बंद ठेवावे लागले. वादळाची तीव्रता इतकी होती की, सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेली सात विमाने इतरत्र वळवावी लागली, तर ५६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. रात्री १० नंतर विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली.
रात्री विमानतळ सुरू झाल्यानंतर ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने पहिले लँडिंग केले, तर एअर इंडियाच्या विमानाला पहिल्या उड्डाणाचा मान देण्यात आला. १८ मे रोजी मुंबई विमानतळावरील उड्डाणे वेळापत्रकानुसार सुरू होती, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, वादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यामुळे खबरदारी म्हणून राजकोट, अहमदाबाद आणि बडोदा विमानतळ बंद ठेवण्यात आले.
--------------------------------