मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प साडेचार वर्षांत पूर्ण करण्याचे नियाेजन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पाइल, पाइल कॅप, पुलाच्या खांबाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे सेगमेंट बनविण्याचे काम कास्टिंग यार्डमध्ये सुरू केले. पुलाच्या गाळ्याचे सेगमेंट उभारणीचे काम अणि तात्पुरत्या पुलाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. प्रकल्पाची अर्थिक प्रगती ४२ टक्के झाली आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी साडेचार वर्षे आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांचे काम केले जात आहे. या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या २२ कि.मी. लांबीच्या ६ पदरी पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ कि.मी. असून, जमिनीवरील पुलाची लांबी ५.५ कि.मी. आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व नवी मुंबईतील शिवाजीनगर, राज्य मार्ग - ५४ व राष्ट्रीय महामार्ग ४ ब व चिले गावाजवळ आंतरबदल आहेत.
--------------------
* प्रस्ताव ३० वर्षांपूर्वीपासून
मुंबई येथील वाहतूककोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचा प्रस्ताव ३० वर्षांपूर्वीपासून विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्य भूमी (नवी मुंबई) वरील न्हावा यादरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता.
--------------------
काय होणार?
- नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास होणार
- मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार
- प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार
- मुंबई व नवी मुंबई आणि कोकण यामधील अंतर कमी होणार
- इंधन व वाहतूक खर्चात बचत होणार आहे.
--------------------