कचऱ्याची उघड्यावर वाहतूक
By admin | Published: July 3, 2014 01:48 AM2014-07-03T01:48:51+5:302014-07-03T01:48:51+5:30
शहराच्या विविध भागात उघड्या ट्रकमधून होणाऱ्या कचरा वाहतुकीच्या विरोधात भाजपाने दंड ठोठावले आहेत
नवी मुंबई: शहराच्या विविध भागात उघड्या ट्रकमधून होणाऱ्या कचरा वाहतुकीच्या विरोधात भाजपाने दंड ठोठावले आहेत. याअंतर्गत मंगळवारी भाजपा कार्यकर्त्यांनी सानपाडा येथे कचऱ्याची उघड्यावर वाहतूक करणारा एक ट्रक अडवून मनपाकडून कचरा व्यवस्थापनाच्या कामात कशाप्रकारे हलगर्जीपणा केला जातोय, हे प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून शहरातील दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावताना आवश्यक खबरदारी बाळगली जात नाही. अनेक भागात उघड्या ट्रकमधून कचऱ्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे संसर्गजन्य व साथीच्या रोगाचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नवी मुंबई सरचिटणीस संतोष पाचलग यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या आधारे गेल्या महिन्यात महापालिकेच्या विरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरही कचरा वाहतुकीसंदर्भातील परिस्थिती जैसे थे असल्याने भाजपाने या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन छेडले आहे. मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत सानपाडा येथे कचऱ्याने भरलेला एक ट्रक अडविण्यात आला. ट्रक चालकाला गुलाब पुष्प देवून यापुढे नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळू नका, अशी उपरोधिक विनवणी करण्यात आली. तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यावेळी गुलाब पुष्प देऊन विनवणी करण्यात आली. याप्रसंगी संतोष पाचलग यांच्यासह भाजपाच्या प्रदेश चिटणीस प्रा.वर्षा भोसले, नवी मुंबईचे माजी अध्यक्ष भगवान ढाकणे, उपाध्यक्ष सुनील होनराव, सचिन खाडे आदी उपस्थित होते. प्रदूषण मंडळाने तातडीने अहवाल तयार करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पाचलग यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)