वाहतूक पोलीसही सज्ज
By Admin | Published: September 15, 2015 04:56 AM2015-09-15T04:56:28+5:302015-09-16T11:52:34+5:30
गणेशोत्सवात विसर्जनादरम्यान वाहतुकीचे तीनतेरा वाजू नये, यासाठी वाहतूक पोलीसांकडून यंदा मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. विसर्जनासाठी जय्यत
मुंबई : गणेशोत्सवात विसर्जनादरम्यान वाहतुकीचे तीनतेरा वाजू नये, यासाठी वाहतूक पोलीसांकडून यंदा मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, यावेळी ३ हजार ४१0 पोलीस वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कार्यरत असतील, अशी माहीती सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारांबे यांनी दिली. त्याचप्रमाणे ४९ रस्ते मिरवणुकांसाठी राखीव ठेवून ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच विसर्जनादरम्यान तर मोठी समस्याच उद्भवते आणि त्याचा फटका वाहनचालकांना बसतो. एकूणच परिस्थिती पाहता प्रत्येक वर्षी वाहतूक पोलिसांकडून विसर्जनादरम्यान वाहतुकीचे नियोजन केले जाते. यंदा १७ सप्टेंबर रोजी गणरायांचे आगमन होत आहे. त्यानंतर १८ तारखेला दीड दिवसाच्या, २१ सप्टेंबरला पाच दिवसांच्या, २३ सप्टेंबर रोजी सात दिवसांच्या आणि २७ सप्टेंबर रोजी १० दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. या दिवशी गिरगाव, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, मालाड मार्वे टी जक्शन आणि पवई गणेशघाट येथे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचे विसर्जन केले जाते. हे पाहता यंदा वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ४९ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारांबे यांनी सांगितले.
तसेच ५५ रस्त्यांवरील वाहतूक एकदिशा, १८ रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तर ९९ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे ते म्हणाले.
गणेश विसर्जनस्थळी बंद पडलेली वाहने किंवा वाळूत रुतलेली वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वाहतूक व मिरवणूका वेगवेगळ्या करण्यासाठी विविध रस्त्यांवर ड्रम्स व दोरखंड वापरले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिन्यांची सोय विविध स्वयंसेवी संस्थांमार्फतही करण्यात येत असल्याचे भारांबे म्हणाले.
3,410 वाहतूक पोलीस सज्ज ...
विसर्जनादरम्यान वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी ३ हजार ४१0 वाहतूक पोलीस सज्ज राहणार आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनाचे ९00 विद्यार्थी, अनिरुद्ध बापू डिजेस्टर मॅनेजमेन्ट अॅकॅडमीचे सहा हजार स्वयंसेवक, नागरी संरक्षण दलाचे १,५00 स्वयंसेवक, स्काऊट अॅण्ड गाईडचे ३00 विद्यार्थी, गृहरक्षक दलाचे २५0 जवान, ५४ वाहतूकरक्षक, रस्ता सुरक्षा दलाचे १00 शिक्षक, राष्ट्रीय छात्रसेनेचे ४00 विद्यार्थी, जल सुरक्षा दलाचे ५00 स्वयंसेवक, हॅम रेडिओचे ३५ स्वयंसेवक, सशस्त्र पोलीस दलाचे १00 जवान आणि काही महाविद्यालयीन विद्यार्थी मदतीला असतील.