मुंबई : प्रवेश बंदी असलेल्या मार्गावरुन येणाऱ्याला अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ट्रफिक पोलिसाला रिक्षाचालकाने शिवीगाळ करून मारहाण करण्याची घटना गोरेगावातील मुलुंड लिंक रोडवर घडली. कॉन्स्टेबल अविनाश बामणे असे त्यांचे नाव असून मारहाणीनंतर रिक्षाचालक व त्याच्या सहकाऱ्यांनी पलायन केले. याबाबत वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश बामणे हे वाहतूक शाखेच्या दिंडोशी चौकीत कार्यरत आहेत. ते मुलुंड लिंक रोडवरील मिरचीवाला चाळ येथील शांती हॉटेलसमोर ड्युटी बजावित होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या समोरून ‘नो एन्ट्री’असलेल्या दिशेने एक रिक्षा येत होती. त्यांनी त्याला थांबविले असता तो रिक्षातून बाहेर येत चालकाने त्यांना शिवीगाळ करीत वाद घालू लागला. रस्त्याच्या बाजूला ढकलीत मारहाण केली. बामणे खाली पडले असता रिक्षा चालक तेथून पळून गेला. बामणे यांनी नियंत्रण कक्षाला कळविले. मात्र मदत येईपर्यत परिसरात असलेल्या त्याच्या सहकाऱ्याने रिक्षा घेऊन पलायन केल्यामुळे बामणे यांना त्याचा नंबर नोंदविता आला नाही. रिक्षाचालक परिसरातील असून ‘साजन’ या नावाने तो परिचित असल्याची माहिती बामणे यांनी वनराई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसाला गोरेगावात मारहाण
By admin | Published: June 14, 2016 3:30 AM