Join us

वाहतूक पोलिसाने पकडला गुटखा

By admin | Published: December 11, 2015 1:43 AM

गुटख्याची बेकायदा वाहतूक करणारा एक टेम्पो वाहतूक हवालदाराने पकडल्याची घटना गोरेगाव येथे जेव्हीएलआर पुलावर घडली.

मुंबई : गुटख्याची बेकायदा वाहतूक करणारा एक टेम्पो वाहतूक हवालदाराने पकडल्याची घटना गोरेगाव येथे जेव्हीएलआर पुलावर घडली. भगवंतराव टोके असे या कर्तबगार पोलिसाचे नाव आहे. त्यांनी ५ लाख रुपयांचा पानमसाला आणि तंबाखूच्या ३४ गोणी जप्त केल्या. याप्रकरणी टेम्पोचालक अनिल अछवर सिंहला अटक करण्यात आली आहे.दिंडोशी वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असललेले हवालदार भगवंतराव टोके हे बिंबीसार नगरात महामार्गावर ड्युटी बजावित होते. त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दहिसर येथून एका टेम्पोतून गुटखा व तंबाखू विक्रीसाठी मुंबईत आणला जात आहे. त्यांनी सहकारी साहाय्यक फौजदार म्हेत्रे, हवालदार शेडगे, चालक पाटील यांना सोबत घेऊन त्या मार्गावर पाळत ठेवली. दुपारी एकच्या सुमारास साक्षी ट्रान्सपोर्ट असे लिहिलेला एक टेम्पो जे. व्ही. एल. आर. पुलावरून जात असताना टोके यांनी त्याला थांबण्याची सूचना केली. मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर टोके यांनी टेम्पोचा पाठलाग करून तो अडविला. त्यातील १७ गोण्यांत सुमारे ४ लाख ८ हजार रुपयांचा पानमसाला व अन्य १७ गोण्यांमध्ये एक लाख २० हजार रुपये किमतीचा तंबाखू आढळला. त्यांनी चालकासह टेम्पो ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)