मुंबई : काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी महिलेलाल बेड्या ठोकल्या आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, महिलेने सार्वजनिक ठिकाणी वर्दीचा अनादार केला, तरी संय ठेवत महिलांचा आदर राखल्यामुळे त्या ट्रॅफिक हवालदाराचा एसीपी लता धोंडे यांनी भररस्त्यात गाडी थांबवून सत्कार केला.
मुंबईतील कुलाबा विभाग सहायक पोलीस आयुक्त, लता धोंडे यांनी ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्टे यांचा भरचौकात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महिलेने भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अनादर करण्यात आला, पण आपण संयम राखला, महिलेचा आदर कायम ठेवला. त्यामुळे, त्याच रस्त्यावर येऊन मी आपला सन्मान करत असल्याचे धोडे मॅडम यांनी म्हटल्याचे ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्थे यांनी लोकमतशी बोलताना म्हटले. तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करुन आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही आयुक्त धोंडे यांनी दिले आहे. दरम्यान, लता धोंडे सध्या कुलाबा, कफ परेड आणि मरीन ड्राईव्ह विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आहेत. यापूर्वी वाहतूक विभागातही त्यांनी सेवा बजावली आहे.
कॉटन एक्सचेंज नाका येथे ट्रॅफिक हवालदार आपले कर्तव्य बजावत असताना या सादविका या महिलेसोबत एक इसम होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करुन वाहतूक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना मारहाण केली. त्यांची नेमणूक काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन येथे करण्यात आली होती. याप्रकरणी एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली. या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत वाहतूक पोलिसाने महिलेला शिवी घातल्याचा आरोप महिलेनं केला होता. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रस्त्यावर लोकांना जमवून वाहतूक पोलिसांच्या श्रीमुखात लगावली. आता, याप्रकरणातील ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्टे यांचा महिला पोलीस अधिकाऱ्याकडून सत्कार करण्यात आला आहे.
काय आणि कसं घडलं हे प्रकरण ?
दि. २३/१०/२०२० रोजी दुपारी १५ १५ . दरम्यान काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार एकनाथ पार्टे हे कॉटन एक्सचेंज चौक, सुरती हंटिलसमोर, काळबादेवी या ठिकाणी दैनंदिन कर्तव्य बजावित होते. त्यादरम्यान एक मोटार सायकलस्वार विना हेल्मेट मोटार सायकल चालवून वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांन विना हेल्मेटची कारवाई करण्यासाठी थांबविले. त्यावेळी पुरुष मोटार सायकलस्वार व महिला यांनी पोलिसांशी हुज्जत घालावयास सुरुवात केली. पार्टे यांनी त्यांना सर" व "मॅडम" असे संबोधून कोणतीही शिवीगाळ व अपशब्द उच्चारलेला नसताना देखील पोलिसाने अपशब्द व शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप महिला करु लागली. नंतर महिला त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण करु लागली. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
पार्टे यांनी संयम दाखवला
पोलीस हवालदार पार्टे यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की व मारहाण करीत असताना देखील पार्टे यांनी स्वत:चा संयम ढळू न देता कोणतीही अर्वाच्च भाषा न वापरता आरोपी महिलेला मॅडम" असे संबोधल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करीता महिला पोलीस अमलदारांना बोलावून घेतले. ही घटना पडत असताना पोलीस पार्टे यांनी आरोपी महिलेविरुध्द कोणतेही गैरवर्तन झालेले दिसून येत नाही.