जमीर काझी, मुंबईमहानगरातील बेशिस्त वाहतुकीला गेल्या काही महिन्यांपासून बऱ्यापैकी चाप बसला आहे. तरीही अद्याप वाहतुकीचे नियम मोडणारी वाहने सर्रास आढळत आहेत. कारण त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडे सक्षम यंत्रणाच नाही. बेशिस्त वाहने उचलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘क्रेन’ची मोठी वानवा भासत आहे. त्यामुळे कोणी वाहने देता का, अशी विचारणा होत आहे.वाहतूक विभागाच्या वतीने के्रन निवडीसाठी इच्छुकांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. वाहनमालक/चालकांनी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर निविदा काढण्यात आल्या आहे. मात्र केवळ चार महिन्यांसाठी वापर आणि त्यासाठी जाचक अटी व नियमांमुळे थंडा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रोज महानगरात लोकल व बसेसशिवाय ३ लाखांहून अधिक खासगी वाहने रस्त्यांवर असतात. एमएमआरडीएने वर्षभरापूर्वी कार्यान्वित केलेला चेंबूर ते सॅण्डहर्स्ट रोड पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे), उपनगरातील काही उड्डाणपूल आणि वाहतूक शाखेचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राबविलेल्या अभिनव योजनांमुुळे काही प्रमाणात वाहतूककोंडी कमी झाली आहे़ बेशिस्त वाहनचालकांवर प्रथमच त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा दंडुका उगारल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अद्यापही अनेक मार्गांवर नो पार्किंग, वन वे असलेल्या ठिकाणी सर्रास वाहने लावली जात असल्याचे आढळून येते़ अशी वाहने उचलून दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र मिळालेल्या माहितीनुसार शहर व उपनगरांत मिळून सध्या अशा के्रनची संख्या जेमतेम ५१ आहे.
ट्रॅफिक पोलिसांना ‘क्रेन’ची वानवा
By admin | Published: November 18, 2014 1:31 AM