मुंबई : दारूच्या नशेत बेदरकार गाडी चालवून मितेश मोदी (36) या तरुणाने एका वाहतूक पोलिसाचा जीव
घेतला, तर दुस:याला गंभीर जखमी केले. काल मध्यरात्री 2च्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर मोदीच्या झेनने वाहतूक पोलिसांची बाईक उडवली.
वाहतूक विभागात फौजदार असलेले राजाराम देसाई (53) या अपघातात ठार झाले; तर त्यांचे सहकारी पोलीस शिपाई शंकर कदम गंभीर जखमी झाले. कदम यांच्यावर फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रोळी पोलिसांनी आरोपी मितेश याला निष्काळजीपणो वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
प्रसिद्ध मसाले कंपनीत मोठय़ा पदावर कार्यरत असलेला मोदी सहका:यांसोबत पार्टी झोडून घरी परतत होता. त्याच्या भरधाव कारने नाकाबंदी आटोपून घरी निघालेल्या कदम यांच्या बाईकला मागून धडक दिली. या धडकेने बाईक चालविणारे कदम आणि मागे बसलेले देसाई रस्त्यावर आदळले. यात देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी मितेश याला कारवाईसाठी ताब्यात घेतले तेव्हाच तो दारूच्या नशेत आहे हे स्पष्ट जाणवत होते. त्याच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहेत, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक दिनेश देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)