वाहतूक पोलिसांना करावे लागते बॉडी कॅमेऱ्याचे रक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:07 AM2021-01-14T04:07:20+5:302021-01-14T04:07:20+5:30
मुंबई : पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले, हिंसाचार, वाहतुकीचे उल्लंघन याबाबत फोटोग्राफिक/व्हिडिओ पुरावे राहावेत, गुन्हेगारांना अद्दल घडावी म्हणून वाहतूक पोलिसांना ...
मुंबई : पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले, हिंसाचार, वाहतुकीचे उल्लंघन याबाबत फोटोग्राफिक/व्हिडिओ पुरावे राहावेत, गुन्हेगारांना अद्दल घडावी म्हणून वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. मात्र, वाहतुकीत वाहनचालकांपेक्षा कॅमेऱ्याच्या रक्षणाकडे लक्ष द्यावे लागते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
२०१६ मध्ये एका कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला; पण दोन वर्षांनंतरही पायलट प्रोजेक्ट सुरू होऊ शकला नाही. विलास शिंदे यांनी एक मोटारसायकलस्वार आणि त्याच्या साथीदाराकडे कागदपत्रे मागितली होती; पण या विनंतीचे पालन करण्याऐवजी दोघांनी कॉन्स्टेबलवर हल्ला केला आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी मुंबईत एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती.
एका वाहतूक पोलिसाने सांगितले की, वाहतूक पोलिसांना जे कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यामध्ये जर एखाद्यावर हल्ला झाला तर ते रेकॉर्ड होईल, गुन्हेगाराला शिक्षा मिळेल. मात्र, या कॅमेऱ्याचे वजन जास्त आहे, त्यामुळे हाताळणे कठीण जाते. एखादा वाहनचालक पळाला तर त्याचा पाठलाग करताना बॉडी कॅमेऱ्याची काळजी घ्यावी लागते. धावपळ करताना कॅमेरा पडला तर त्याच्यातील सर्व माहिती जाऊ शकते.
तर बॉडी कॅमेऱ्याचे वजन जास्त नाही, ते हाताळता येईल. ते वाहतूक पोलिसांना फायदेशीर आहे. रेकॉर्डिंग होत असल्याने गुन्ह्याचा छडा लावणे सोपे होईल, असे वाहतूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.