वाहतूक पोलिसांची हेल्पलाइन
By Admin | Published: November 11, 2015 02:10 AM2015-11-11T02:10:34+5:302015-11-11T02:10:34+5:30
व्हॉट्सअॅप, एसएमएस, व्हॉइस कॉलद्वारे आता नागरिकांना वाहतुुकीसंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या ८४५४९९९९९९ या नव्या टोल
मुंबई : व्हॉट्सअॅप, एसएमएस, व्हॉइस कॉलद्वारे आता नागरिकांना वाहतुुकीसंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या ८४५४९९९९९९ या नव्या टोल फ्री हेल्पलाइनचे मंगळवारी बॉलीवुड अभिनेता हृतिक रोशन याच्या हस्ते वरळीतील वाहतूक मुख्यालयात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे उपस्थित होते. तक्रारींबरोबरच वाहतूककोंडी आणि अन्य माहितीही या नव्या हेल्पलाइनद्वारे मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांचे एमटीपीकॉल हे अॅप सुरू होणार असून, लवकरच ते प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.
वरळी येथील वाहतूक पोलीस मुख्यालयात या हेल्पलाइनकरिता विशेष कक्षही उभारण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. व्हॉइस कॉल, व्हॉट्सअॅप, एसएमएस व अॅपद्वारे नागरिकांना माहिती मिळवता येणार असून, तक्रार नोंदही करता येणार आहे. यामध्ये तक्रारीकरिता विशिष्ट क्रमांक दिला जाणार असून, नागरिकांनी केलेल्या तक्रारींबाबत काय कारवाई झाली याची माहितीही मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वाहनधारकांना टोव्हिंग क्रेनने केलेल्या कार्यवाहीचीही माहिती मिळणार आहे. बेकायदा पार्किंगमधील वाहने टोव्हिंग क्रेनने उचलल्यानंतर ती कोठे नेण्यात आली व काय कारवाई झाली याची माहिती मिळणार असल्याचे वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले. तसेच वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची माहितीही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पे अॅन्ड पार्क, बेस्ट, रेल्वे, मेट्रो, टॅक्सी, रिक्षा तसेच वाहतुकी संदर्भातील सर्व यंत्रणांची
माहिती मिळेल.
वाहतूक शाखा कार्यपध्दती व वाहतूक विभागाकडून मिळणाऱ्या परवान्यासंदर्भात माहिती व अर्ज नमुना व तो करण्याची पद्धत याबाबत माहिती उपलब्ध राहील.
रस्त्यासंदर्भातील माहिती त्यामध्ये पर्यायी मार्ग, अंतर, प्रवास वेळ, रस्त्यावर चालणारे वर्क इन प्रोग्रेसबाबात माहिती मिळेल. त्यामध्ये रस्ते खोदकाम इत्यादी तसेच इव्हेंट, रॅली, रिलीजियस प्रोसेशन याचाही समावेश आहे.