‘फिरस्त्या’ वाहतूक पोलिसांना आराम !
By Admin | Published: February 19, 2016 02:46 AM2016-02-19T02:46:55+5:302016-02-19T02:46:55+5:30
वाहतूक विभागाचा बटवडा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आतानव्या निर्णयानुसार आराम मिळणार आहे. वरिष्ठांचे आदेशपत्र, सूचना आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची मुख्यालयात
जमीर काझी, मुंबई
वाहतूक विभागाचा बटवडा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आतानव्या निर्णयानुसार आराम मिळणार आहे. वरिष्ठांचे आदेशपत्र, सूचना आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची मुख्यालयात देवाण-घेवाण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ३४ अंमलदारांना या कामातून हटविण्यात आले आहे. त्याऐवजी आता केवळ ५ जणांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शहर व उपनगरातील वाहतूक चौक्यांमधून ‘टपाल’ नेण्यासाठी वरळी येथील मुख्यालयात हे पोलीस कर्मचारी ये-जा करतात. या कामासाठी इतके पोलीस कर्मचारी जुंपण्यात आल्याचे लक्षात आल्याने, सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व ३४ चौक्यांतील टपालाची जबाबदारी विभागवार ५ कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ आणि सरकारी वाहनातील इंधनाची बचतही मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचप्रमाणे ‘टपाला’साठी होणारा उर्वरित अंमलदाराचा वापर आता वाहतूक नियंत्रण आणि बंदोबस्तासाठी केला जाणार आहे. त्यांना ‘ड्युटी’ लावण्याच्या सूचना संबंधित वाहतूक चौकीच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
वाहतुकीच्या अनुषंगाने वरळीच्या वाहतूक मुख्यालयातील कागदपत्रांची ने-आण करण्यासाठी प्रत्येक चौकीतून एका अंमलदाराची नेमणूक केली जाते. त्यांना दिवसभर केवळ मुख्यालयात पत्रांची देवाण-घेवाण करणे एवढेच एक काम असते. त्यासाठी सरकारी मोटारसायकलचा वापर केला जातो. हे अंमलदार मुख्यालयात टपालाच्या कामानंतरही विविध अधिकाऱ्यांच्या कार्यालयात व प्रशासन विभागात थांबून असतात. त्यामुळे सहआयुक्त भारंबे यांनी आता या अंमलदारांना मुख्यालयात प्रवेश करण्यास आडकाठी घातली आहे.
शहर व उपनगरातील ३४ चौक्यांतील टपालाचे काम आता केवळ ५ जणांवर सोपविण्यात आले आहे. त्यांनी आपल्या परिसरातील चौकी, सहायक आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे ने-आण करण्याची जबाबदारी सोपविली आहे. रोज दुपारी बारापर्यंत मुख्यालयात ती पोहोचवावी लागतील. उर्वरित २९ कर्मचाऱ्यांना दैनंदिन ड्युटीसाठी वापरले जाईल. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. शिवाय त्यांच्याकडील शासकीय वाहनांचा वापर ‘पेट्रोलिंग’साठी करता येणार आहे, असे वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.