ठाणे : सुटी असतानाही वाहतूक नियंत्रण शाखेच्या रघुनाथ कवळे या पोलीस हवालदाराने रेल्वेच्या ट्रॅकमध्ये पडलेल्या पूनम सदाशिव शेवाळे (२१) या तरुणीला मदतीचा हात देऊन तिचे प्राण वाचविले. ही घटना शनिवारी घडली. एरव्ही, एखादा गुन्हा न नोंदविण्यासाठी तो आपल्या हद्दीत येत नसल्याबाबत स्पष्टीकरण देणाऱ्या पोलीस खात्यातीलच आपल्या सहकाऱ्यांसमोरही त्यांनी या घटनेतून एक आदर्श ठेवला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर २१ मार्च रोजी दुपारी १ वा.च्या सुमारास ही घटना घडली. हैदराबाद एक्स्प्रेसला ठाण्याला थांबा नाही. परंतु, वेग मंदावल्याने चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात असताना एक मुलगी पडल्याचे शेवाळे यांना समजले. या घटनेनंतर अनेक प्रवाशांनी आरडाओरडाही केला. खूप गर्दीही केली. तोपर्यंत गाडी निघून गेली होती. जखमी अवस्थेत ती ट्रॅकजवळ विव्हळत पडलेली होती. गर्दी जमूनही मदतीला मात्र कोणीही पुढे आले नाही. काहींनी तर हा प्रसंग टिपण्यासाठी मोबाइलवर तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शहर वाहतूक शाखेचे कवळे हे वैयक्तिक कामासाठी तिथून जात होते. गर्दी पाहून ते पुढे आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित खाली उतरून जखमी पूनमला प्लॅटफॉर्मवर घेण्याचा प्रयत्न केला. इतक्यात, रेल्वेचे हमालही तिथे आले. त्यांच्या मदतीने तिला फलाटावर ठेवून नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिला उजव्या हाताला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. कवळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कर्तव्यदक्षतेने हालचाली केल्याने पूनमला वेळेत औषधोपचार मिळाले. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार बी.जी. मोडक याप्रकरणी तपास करीत आहेत. ती विक्रोळीच्या टागोरनगरमधील नीलकमल चाळीत वास्तव्याला असून विकास कॉलेजमध्ये शिकते. (प्रतिनिधी)