Join us

वाकोल्यात वाहतूक पोलिसावर हल्ला

By admin | Published: April 12, 2016 1:35 AM

वाहतूक पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, गुरुवारी पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मुंबई: वाहतूक पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, गुरुवारी पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विलेपार्ले वाहतूक शाखेमध्ये अमुकसिद्ध धुलप्पा करपे हे हवालदार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान, वाकोला पुलाजवळ ते वाहतूक नियोजनाचे कार्य करत होते. त्या वेळी एक कार त्यांच्याजवळ आली. या कार चालकाकडे त्यांनी गाडीची कागदपत्रे, तसेच लायसन्स दाखविण्याची मागणी केली. त्या वेळी त्यांनी स्वत:ची कागदपत्रे न दाखवता, करपे यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली, तसेच त्यांना धक्काबुक्कीदेखील करण्यात आली, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणी करपे यांनी वाकोला पोलिसांना कळविले. त्यानुसार, वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, करपे यांच्यावरील दोघा हल्लेखोरांना कारसह ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ‘पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी जिमित वडेरा आणि मयांक ठक्कर या दोघांना आम्ही कारसह ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावर संगनमत, सरकारी कामात अडथळा आणण्यासोबतच अन्य संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव व्हावळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)२५ फेब्रुवारी २०१६ : गोरेगाव वाहतूक शाखेत कार्यरत असलेले दत्ताराम घुगे (४३) यांच्यावर रोजी रात्री गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील बिंबीसार परिसरात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी ट्रक चालक मोहम्मद उस्मान कमरुल हक (२५) आणि ट्रक क्लीनर अहमदअली मोहम्मद आमीन (२३) या दोघांना वनराई पोलिसांनी अटक केली. ५ मार्च २०१६ : डीएन नगर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या संजय नवले यांच्यावर आयओसी जंक्शनजवळ विकी साळवे आणि श्याम बनसोडे या मोटारसायकलस्वारांनी हल्ला केला होता. या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. २५ मार्च २०१६ : जे.जे. पुलावर मोटारसायकल चालविण्यास बंदी असतानादेखील, या ठिकाणी मोटारसायकल चालविणाऱ्या अहमद अन्सारी आणि मेवियन अन्सारी यांनी पायधुनी वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई अमोल गवाणकर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. १४ मार्च २०१६ : दक्षिण मुंबईतील नागपाडा वाहतूक शाखेच्या एका महिला पोलिसाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकाविणाऱ्याचा प्रकार महालक्ष्मी जंक्शनकडे घडला होता. या प्रकरणी मयूर जेधे या तरुणाला अटक करण्यात आली होती.