लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डंपरच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू तर सोबत असलेले ट्रॅफिक वार्डन जखमी झाले. वनराई परिसरात हा अपघात घडला असून याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग सपकाळ (४०) असे मृत वाहतूक पोलिसाचे नाव आहे. ते दिंडोशी वाहतूक विभागात कार्यरत होते. मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास ते त्यांचे सहकारी भावेश पितळे (३२) यांच्यासह हब मॉल समोरील पश्चिम द्रुतगती महामार्गावरून निघाले होते. त्यावेळी एक डंपर भरधाव वेगाने त्या ठिकाणी आला आणि त्याने सपकाळ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मोटरसायकलवरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या सपकाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर पितळे यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वनराई पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात येणार आहे.