मुंबई : नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी राज्यात मार्चपर्यंत आणखी १८ पासपोर्ट सेवा केंद्रे सध्या सुरू करण्यात येतील, अशी घोषणा महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.सध्या राज्यात १६ पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू आहेत. वाहतूक पोलिसांद्वारे पाठविण्यात येणारी ई चलन यापुढे टपालाद्वारे पाठविण्यात येतील, असे राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त पत्रकार परिषदेत बोलताना अग्रवाल यांनी सांगितले. सध्या मुंबई, पुणे व ठाणे येथे याबाबत पोलिसांसोबत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. या वेळी मुंबईचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, सुमिथा अयोद्धा, के. एस. बरीयार, संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते.टपाल खात्याची ७५ एटीएम केंद्रे सुरू केली आहेत. आवश्यकतेनुसार पोस्टमन भरती करण्यात येतील, असे अग्रवाल यांनी सांगितले. राज्याच्या प्रत्येक मोठ्या जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याबाबत टपाल खाते सकारात्मक आहे. पासपोर्ट विभागाशी चर्चा करून, आवश्यकतेप्रमाणे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.स्पीडपोस्टच्या माध्यमातून ई चलान पाठविण्याचा प्रस्ताव टपाल खात्याने दिला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते सुरू करण्याबाबत महाराष्ट्राला देशपातळीवर तृतीय क्रमांक मिळाला आहे. ७८ हजार खातेदारांच्या माध्यमातून १ कोटी १० हजार रक्कम जमा झाली आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत पेमेंट बँकेची ३ हजार अॅक्सेस पॉइंट सुरू करण्यात येतील. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील १२ हजार ४८४ अॅक्सेस पॉइंट सुरू होतील, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला.महाराष्टÑ, गोवा सर्कलमधून सर्वाधिक महसूलवाहन परवाने, वाहन नोंदणी कागदपत्रे अशी आरटीओशी संबंधित कागदपत्रे स्पीडपोस्टने पाठवून टपाल विभागाला २५ कोटी, महावितरणच्या देयकांच्या माध्यमातून ७ कोटी तर नागपूर येथील ई चलानच्या माध्यमातून २ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. टपाल खात्याला १,०७० कोटी इतका देशातील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र व गोवा सर्कलमधून प्राप्त झाल्याचे अग्रवाल म्हणाले.
वाहतूक पोलिसांचे चलान टपालाने, राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 2:53 AM