अमर शैलाप्रतिनिधी
मुंबई महानगरात वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. उपनगरीय रेल्वेवर वाहतुकीचा ताण आहे. त्यातच मुंबईतील रस्त्यांवर खासगी वाहनांची संख्या वाढू लागल्याने रस्त्यांवरही कायमच वाहतूक कोंडी असल्याचे दिसते. त्यातून मुंबईकरांच्या प्रवास कोंडीत भर पडत आहे.
मेट्रोमुळे ही कोंडी कमी होईल, तसेच मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल, असा दावा सर्वच यंत्रणांकडून करण्यात आला. त्यानुसार मुंबई महानगरात ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले होते. यातील बहुतांश मेट्रो मार्गिकेवरून २०२४ पर्यंत प्रवासी वाहतूक सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, मेट्रोंच्या कामालाही मोठा विलंब झाला असून, सध्या १४ मेट्रो मार्गिकांपैकी केवळ ३ मार्गिकांवरूनच प्रवासी वाहतूक सुरू होऊ शकली आहे. त्यातून मुंबईकरांची प्रवास कोंडी आणखी काही काळ सुटण्याची चिन्हे दिसत नाही.
एमएमआरडीएने हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पांपैकी सद्य:स्थितीत अंधेरी पूर्व ते दहिसर मेट्रो ७ आणि डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो २ अ या दोन मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून साधारपणे ९ लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सद्य:स्थितीत केवळ सुमारे दोन लाख ३५ हजार प्रवाशांकडूनच प्रवास केला जात आहे. मंडाळे ते डी.एन.नगर मेट्रो २ बी मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर मंडाळे ते दहिसर अशी सलग जोडणी मिळेल. त्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होऊ शकेल. सद्य:स्थितीत मेट्रो २ बी मार्गिकेचे सुमारे ६४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पूर्ण होऊन ही मेट्रो मार्गिका सुरू होण्यासाठी जून २०२५ उजाडणार आहे.
मीरा भाईंदर ते विमानतळ अशी सलग मेट्रो जोडणी मिळण्यासाठी मेट्रो ९ आणि मेट्रो ७ अ मार्गिका सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, मेट्रो ९ मार्गिकेच्या कारशेडचा तिढा निर्माण झाल्याने तिला विलंब झाला आहे. या मेट्रो मार्गिकेच्या उत्तन येथील कारशेड उभारणीसाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
त्याचबरोबर पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेचे ७५ टक्के काम झाले आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षामुळे कारशेडच्या कामाला विलंब झाला. ठाणे- कल्याण- भिवंडी मेट्रो ५ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र कारशेडअभावी ही मेट्रो सुरू होऊ शकणार नाही. हीच परिस्थिती वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची आहे. या मेट्रो मार्गिकेच्या कारशेडच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. त्यातून मेट्रो ४, मेट्रो ५, मेट्रो ६ आणि मेट्रो ९ मार्गिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने निघालेले असले तरी कारशेड अभावी या मेट्रो मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी अडीच ते तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे २०२६ या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२७ मध्ये या नव्या मेट्रो मार्गिका सुरू होऊ शकतील.
कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेलाही मोठा विलंब झाला आहे. आरे ते बीकेसी हा टप्पा एप्रिलमध्ये सुरू केला जाईल, असे यापूर्वी एमएमआरसीएलकडून सांगितले जात होते. मात्र, अद्याप या मार्गिकेच्या चाचण्या पूर्ण झाल्या नाहीत. तसेच आरडीएसओ आणि सीएमआरएससारख्या संस्थांकडून तपासणी होणे बाकी आहे. त्यातून या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होण्यासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर उजाडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो प्रकल्पांच्या कामांना विलंब होत असल्याने त्यांच्या खर्चात वाढ होत आहे. ही वाढ मुंबईकरांच्या माथी पडणार आहे. मेट्रो ३ मार्गिकेचा खर्च तब्बल ३७ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
मेट्रो मार्गिकांच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना बेस्ट बस सेवेत सुधारणा करण्यासाठी अपेक्षित पावले उचलली जात नाहीत. परिणामी मुंबईकरांच्या कोंडीमुक्त प्रवासासाठी आणखी काही वर्षांचा वनवास राहणार आहे.