मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मास्टिक, जीओपॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजविल्यास त्या रस्त्यावरील वाहतूक दोन तासांत सुरू होईल, असा विश्वास पालिकेच्या रस्ते विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजविण्यासाठी वॉर्ड स्तरावर किती मास्टिक लागेल याची माहिती अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली होती. ती प्रशासनाकडे आली असून, लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकऱ्यांनी दिली. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या सात झोननिहाय किमान १० कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे.
मुंबईत पालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने पालिकेला मोठ्या टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे.
पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना पालिकेला शहरातील रस्ते कामासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याची स्थिती आहे. पूर्व-पश्चिम उपनगरातील रस्त्यांची फक्त २० टक्केच कामे झाली आहेत. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण कशी होणार? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा यावर्षी खड्ड्यांत जाण्याची स्थिती आहे. त्यामुळे पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पावसाळ्यातही खड्डे बुजविणार आहे. खड्डे बुजविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत मास्टिक पुरविणारे प्लांट नसल्याने मुंबईच्या आजूबाजूला असणाऱ्या १४ प्लांटमधून पुरवठा करण्यात येणार आहे.
... असे आहे नवे तंत्रज्ञान
१) पालिकेच्या माध्यमातून पूर्व मुक्त द्रुतगती मार्गावर ‘मायक्रो सरफेसिंग’ तंत्रज्ञानाने रस्त्याचे काम मजबूतरीत्या करण्यात आले आहे. याने रस्त्याचे काम केल्यानंतर अवघ्या दोन तासांत वाहतूक सुरू करता येते. तर जिओ पॉलिमर तंत्रज्ञानात खड्ड्यांच्या जागीच मटेरियल तयार करून तातडीने खड्डा भरला जातो.
२) सिमेंट रस्त्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. २ तासांत हे मटेरियल सुकल्यानंतर वाहतूक सुरू करता येते. ‘हेवी वेट’ वाहनांची वाहतूक असणाऱ्या रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. १ चौरस मीटर खड्डा भरण्यासाठी ५ हजार रुपयांचा खर्च येतो.
संपूर्ण रस्त्याची करणार डागडुजी-
मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजविण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजविता जास्तीत जास्त मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केवळ खड्डा न बुजविता संपूर्ण रस्त्यांची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येईल. मास्टिक डांबरीकरणात १८० ते २०० अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्वांत जलदगतीने स्थिर होते. त्यामुळे अपयशी ठरलेल्या कोल्डमिस्कऐवजी मास्टिक अस्फाल्टचा वापर करण्यात येणार आहे.