मुंबई: मुंबईमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यात कमी झाल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. बस थांबा, रेल्वे स्थानक या ठिकाणी असलेल्या गर्दीचा फायदा हा नेहमी मोबाईल चोर टोळीकडून घेण्यात आला आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनाने सर्वत्र थैमान घातल्याने गर्दी कमी झाली. परिणामी या टोळक्यांनी रहदारीचे रस्ते, निर्मनुष्य वस्त्या यांना ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केली.
मोबाईलचा आकारही मोठा होऊ लागल्याने तो हातात घट्ट पकडणे सहसा शक्य होत नाही. तसेच पर्सच्या वरच्या कप्प्यात किंवा शर्टाच्या वरच्या खिशात सहसा मोबाईल ठेवण्याच्या सवयीचा फायदा ही टोळकी घेतात त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक असून चोरीला गेलेल्या मोबाईलची पोलिसात तक्रार करणेही तितकेच गरजेचे आहे. अन्यथा चोरीला गेलेल्या फोनचा गुन्हा करण्यासाठी गैरवापर झाल्याचीही अनेक प्रकरणे आहेत. तो ‘धक्का’ ओळखता आला पाहिजे. लोकल असो बस असो अथवा असो मार्केट गर्दीची ठिकाणे आली की मोबाईल चोरांची टोळी सक्रिय होते. हे करताना गर्दीचा फायदा घेत विशेष प्रकारचा धक्का दिला जातो. तो आपल्याला ओळखता येणे आवश्यक आहे. फटका गॅंग, टकटक गॅंग यांच्यासह ही धक्का गॅंगसुद्धा मोठ्या प्रमाणात या चोरीमध्ये सक्रिय असल्याचे पोलीस सांगतात.
तुमचा ‘सेकंड हॅन्ड’ फोन चोरीचा तर नाही ना?
परिमंडळ १० ने मार्च, २०२१ मध्ये विशेष ड्राईव्ह अंतर्गत ३०० फोन हस्तगत केले होते. त्यात जवळपास ११७ फोन हे चोरीचे होते ज्याबाबत स्वतः युजर्सनासुद्धा माहिती नव्हती. त्यामुळे सेकंड हॅन्ड मोबाईल खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
ग्राफ :
२०१९
दाखल गुन्हे : ३३१९, सोडवलेले गुन्हे: १२०८
२०२०
दाखल गुन्हे : २०६६, सोडवलेले गुन्हे: ८३०
२०२१ (जून)
दाखल गुन्हे : ४९३, सोडवलेले गुन्हे: २९४
मोबाईल हरवलाच तर?
मोबाईलमध्ये आपली महत्त्वाची कागदपत्रे, फोटो, क्रेडीट, डेबिट कार्डची माहिती, महत्त्वाचे संपर्क, वेगवेगळ्या ऑनलाईन तसेच आर्थिक व्यवहारांचे मॅसेज अलर्ट सुविधा, मोबाईलमध्ये असलेल्या सीमसोबत रजिस्टर्ड असते. त्यामुळे चोरीस किंवा गहाळ झालेल्या मोबाईलमधून एखाद्या ॲपच्या माध्यमाद्वारे डेबिट कार्डचा वापर करून ऑनलाइन व्यवहार, सायबर स्टाॅकिंग, सायबर बूलिंग, ऑनलाइन डिफेमेनेशन इत्यादी गुन्हे घडू शकतात. त्यामुळे पोलिसात तक्रार करून सीमकार्डचा गैरवापर आपल्याला थांबवता येतो. मोबाईल चोरीला जाताच आपण लवकरात लवकर जीमेल, फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्स ॲपचे पासवर्ड रिसेट करून घ्यावे, जेणेकरून डाटा चोरीपासून वाचू शकतो. त्यामुळे संबंधित हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधत हरविलेल्या मोबाईलमधील सीसीएम कार्ड ब्लाॅक करून तसेच त्याच क्रमांकाचे सीमकार्ड पुन्हा सुरू करून घ्यावे.
डिटेक्शन रेट वाढतोय
आम्ही मुंबईकरांना आवाहन करतो की, आपला मोबाईल चोरीला गेला तर आधी त्याची तक्रार करा. मुंबई पोलीस तुमचा मोबाईल शोधून तुम्हाला पुन्हा परत मिळवून देण्यास समर्थ आहेत. गेल्या काही महिन्यात चोरीची प्रकरणे कमी झाली असून डिटेक्शन रेट वाढीस लागला आहे.
- एस. चैतन्य, उपायुक्त, मुंबई पोलीस प्रवक्ते