सायन-पनवेल मार्गावरील विरुद्ध दिशेची वाहतूक ठरते धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:06 AM2021-05-23T04:06:16+5:302021-05-23T04:06:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सायन-पनवेल मार्गावर छगन मिठा पेट्रोल पंप ते सुमननगर येथील विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक अत्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायन-पनवेल मार्गावर छगन मिठा पेट्रोल पंप ते सुमननगर येथील विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक अत्यंत धोकादायक ठरत आहे. सुमननगरच्या अण्णा भाऊ साठे उड्डाणपुलाखाली मागील दीड वर्षापासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे येथे असणारा सर्व्हिस मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने लाल डोंगर, सुमननगर व पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना नाईलाजाने सायन-पनवेल मार्गावर विरुद्ध दिशेने यावे लागत आहे. या मार्गात पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचप्रमाणे येथे रुग्णालय, पेट्रोलपंप व बसस्थानक असल्याने नागरिकांना या विरुद्ध दिशेच्या वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सायन-पनवेल मार्गावर उमरशी बाप्पा चौक ते सुमननगर दरम्यान वाहनांचा अपघात होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या अपघातामध्ये काही दिवसापूर्वी लालडोंगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूही झाला होता. नाईलाजास्तव विरुद्ध दिशेने गाडी चालविल्याने अनेक वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईलाही सामोरे जावे लागत आहे. यामुळे येथे दररोज वाहन चालक व वाहतूक पोलिसांंमध्ये वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील दीड वर्षापासून सुरू असलेले जलवाहिनी दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे व अण्णा भाऊ साठे उड्डाणपुलाखालील सर्व्हिस मार्ग सुरू करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
...........................................